उरण : विंधणे आणि कंठवली येथील सिडकोच्या नैना प्राधिकरणाच्या हद्दीत खाडी किनारी सीआरझेडचे उल्लंघन करून खासगी विकासकांनी अनाधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारींनंतर सिडकोने सोमवारी (१५) बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करीत बुलडोझर फिरवला आहे. नैना प्राधिकरणाचे अनाधिकृत पथकाचे प्रताप नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
उरण तालुक्यातील विंधणे आणि कंठवली येथील हद्दीतील सिडकोच्या नैना प्राधिकरणाच्या हद्दीत खाडीकिनारी सीआरझेडचे उल्लंघन करून सर्व्हे नंबर १९८ -१ व २ आणि इतर जमिनीवर किसन राठोड आणि इतर विकासकांनी अनेक बेकायदेशीर बांधकामे केली आहेत.जमिनीचे दलाल आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पुढाऱ्यांना हाताशी धरून विकासकांकडून बेकायदेशीररित्या इमारती, बंगले गोदामे उभारण्याचा धडाका लावला आहे.
उरण परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामे करून सर्वसामान्यांना सि-लिंक, विमानतळालगत स्वस्तात प्लॅट, बंगला,गोदाम,जागा मिळवून देतो अशा जाहिराती करून अनेक व्यावसायिक घराची गरज असलेल्यांकडून प्लॅटची बुकींग करून घेत आहेत. घरांसाठी हजार लोकांची बुकींग घेवून विकासक, व्यावसायीक सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक करत आहेत. कुठेतरी डोंगर कपारीत, दलदलीत, कांदळवन क्षेत्रातील किंवा खारफुटीने वेढलेल्या जागेचा सातबारा दाखवून ते या ग्राहकांना फसवतात. घरांची खोटी स्वप्न दाखवितात. घरांची खोटी स्वप्न दाखवणाऱ्या व त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून फसवणूक करणाऱ्या परिसरातील अशा अनेक विकासक आणि बेकायदेशीर बांधकामांविरोधात येथील शेतकरी, नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेऊन सिडकोच्या नैना प्राधिकरण अतिक्रमण विभागाने सोमवारी (१५) पुन्हा एकदा पोलीस फाट्यासह तोडक कारवाई केली. यामध्ये काही पक्की बांधकामे बुलडोझर लावून उद्ध्वस्त केली आहेत.कारवाईच्या ठिकाणी लग्नमंडप असल्याने कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आली असल्याची माहिती सिडकोच्या नैना प्राधिकरणाची अनाधिकृत बांधकाम विभागाचे पथक प्रमुख प्रताप नलावडे यांनी सांगितले.