महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे सिडकोचे नवे उपाध्यक्ष मुखर्जींसमोर आव्हान :

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 01:58 AM2020-08-24T01:58:43+5:302020-08-24T01:58:59+5:30

विमानतळासह अनेक प्रकल्पांना गती देण्याची आवश्यकता, मेट्रोचे काम जैसे थे अवस्थेत

CIDCO's new vice president Mukherjee faces challenge to complete ambitious projects: | महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे सिडकोचे नवे उपाध्यक्ष मुखर्जींसमोर आव्हान :

महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे सिडकोचे नवे उपाध्यक्ष मुखर्जींसमोर आव्हान :

googlenewsNext

कमलाकर कांबळे
नवी मुुंबई : सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष लोकेश चंद्र यांची गेल्या आठवड्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, मुखर्जी यांनी पदभारही स्वीकारला आहे. प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ. मुखर्जी यांच्यासमोर सिडकोच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

मागील चार महिन्यांपासून लोकेश चंद्र यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. अखेर १८ आॅगस्ट रोजी त्यांची बदली करून, त्यांच्या जागेवर डॉ.संजय मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली. लोकेश चंद्र यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प मार्गी लावला. सध्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. असे असले, तरी विमानतळाच्या गाभा क्षेत्रातील दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न पूर्णत: सुटलेला नाही. प्रलंबित मागण्यांसाठी काही ग्रामस्थ आजही स्थलांतर न करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत, शिवाय ताळेबंदीमुळे मागील सहा महिन्यांपासून विमानतळाचे काम ठप्प आहे. हे सर्व अडथळे दूर करून विमानतळ प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे मोठे आव्हान डॉ.मुखर्जी यांच्यासमोर आहे.

लोकेश चंद्र यांनी आपल्या कार्यकाळात मागील अनेक वर्षांपासून रखडलेला नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प मार्गी लावला. पहिल्या टप्प्यातील पाचव्या स्थानकांपर्यंत लोकल सेवा सुरू करण्यात त्यांना यश आले आहे. उर्वरित दुसऱ्या टप्यांचे काम भूसंपादनाच्या मुद्द्यावरून रखडले आहे. हा अडथळा दूर करून नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्याची कसरत डॉ.संजय मुखर्जी यांना करावी लागणार आहे.

नवी मुंबई मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम हाती घेतले आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. त्यातील बहुतांशी स्थानकांचे काम पूर्ण झालेले आहे, तसेच सिग्नल यंत्रणांचे कामही पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, तळोजा येथे मेट्रो शेडही उभारण्यात आला आहे. या मार्गावर धावणाºया चिनी बनावटीच्या तीन मेट्रो कोच सिडकोच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. लोकेश चंद्र यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी यथोचित प्रयत्न केले. नवीन कंत्राटदारांची नियुक्ती केली. डिसेंबर, २0२0 मध्ये पहिल्या टप्पा पूर्ण करून प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू करण्याचा त्यांचा मानस होता, परंतु ताळेबंदीमुळे मागील सहा महिन्यांपासून मेट्रोचे काम जैसे थे अवस्थेत आहेत. परिणामी, मेट्रोची डेडलाइन पुन्हा हुकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने मुखर्जी यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

सिडकोच्या सहकार्यातून जलपर्यटन, वाशी खाडीवर तिसरा उड्डाणपूल, ऐतिहासिक बेलापूर किल्ल्याची डागडुजी आणि संवर्धन, बेलापूर येथील मरिना सेंटर, खारघर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वाणिज्य केंद्र, एरोसिटी प्रकल्प, प्रस्तावित खारघर हेवन हिल, कार्पोरेट पार्क, तसेच सर्वसामान्यांसाठी २ लाख १0 हजार घरांची योजना आदी प्रकल्पांना लोकेश चंद्र यांनी चालना दिली, परंतु ते पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने डॉ. मुखर्जी यांना सकारात्मक प्रयास करावे लागणार आहेत.

नैनाच्या विकासाचे काय?
१) नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात नैना क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार, या क्षेत्रातील १७५ गावांत पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. यातील २३ गावांचा समावेश असलेल्या ३७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या प्रारूप विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, या परिसरात पायाभूत सुविधांच्या कामांनाही सुरुवात करण्यात आली आहे.

२) दुसºया टप्प्यातील उर्वरित १५२ गावांच्या विकास आराखडाही मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही टप्प्यांतील गावांत पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. परंतु विकास आराखड्यावर विकासकांनी घेतलेला आक्षेप, विविध कारणांमुळे बांधकाम परवानगी देण्याबाबत होत असलेला विलंब, अनियंत्रित वाढणारी अनधिकृत बांधकामे आदीमुळे नैना प्रकल्पाचे अस्तित्व पणाला लागले आहे. त्याबाबत सकारात्मक धोरण आखण्याचे आव्हान नवे उपाध्यक्ष डॉ.संजय मुखर्जी यांच्यासमोर असणार आहे.

Web Title: CIDCO's new vice president Mukherjee faces challenge to complete ambitious projects:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.