कोपरखैरणेतील मंदिरांना सिडकोच्या नोटिसा
By Admin | Published: November 17, 2016 06:30 AM2016-11-17T06:30:30+5:302016-11-17T06:30:30+5:30
महापालिकेपाठोपाठ सिडकोनेही अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचे पाऊल उचलले आहे.
नवी मुंबई : महापालिकेपाठोपाठ सिडकोनेही अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचे पाऊल उचलले आहे. कोपरखैरणेतील मैदानांलगतच्या मंदिरांना नोटिसा बजावून कारवाईचे संकेत दिले आहेत; परंतु सिडकोच्या नियोजनातील त्रुटींचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याची टीका रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
कोपरखैरणे सेक्टर ५ ते ८ व १५ ते १८ येथील मैदानालगतच्या मंदिरांना सिडकोने नोटिसा बजावल्या आहेत. ही धार्मिक स्थळे विनापरवाना असल्यामुळे नोटिसा बजावल्यापासून १५ दिवसांच्या मुदतीत मंदिराचे बांधकाम हटवण्याचे नोटीसमार्फत सूचित करण्यात आले आहे. सिडकोने कोपरखैरणे विभागाचा विकास करताना प्रत्येक चार सेक्टरच्या केंद्रस्थानी खेळाचे मैदान उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार रहिवाशांना आवश्यक असणाऱ्या सुविधांचाही त्यावेळी विचार होणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्यामुळे सद्यस्थितीला कोपरखैरणे विभागाची बिकट परिस्थिती झाली आहे. नियोजनाच्या अभावामुळे पार्किंगची सर्वात मोठी समस्या या विभागातील रहिवाशांना भेडसावत आहे. तर विविध सोयी-सुविधांसाठी सिडकोने भूखंडच राखीव न ठेवल्यामुळे उपलब्ध जागेतच अनेकांनी धार्मिक स्थळे बांधलेली आहेत. अशाच दोन धार्मिक स्थळांवर कारवाईचे संकट निर्माण झाले आहे. सुमारे २० वर्षांहून अधिक जुनी ही धार्मिक स्थळे असून मागील ६ ते ७ वर्षांत त्यांची पुनर्बांधणी झालेली आहे. वारकरी सांप्रदायाच्या नागरिकांकडून त्याठिकाणची देखभाल केली जाते. मात्र, सिडकोने ही धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवून नोटिसा बजावल्या आहेत; परंतु सिडकोने धार्मिक स्थळांसाठी जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे पर्यायी जागेत या मंदिरांचे बांधकाम करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सिडकोने धार्मिक स्थळांसाठी जागा उपलब्ध करून दिल्या असत्या, तर ही वेळच आली नसती असाही त्यांचा रोष आहे. त्यामुळे सिडकोच्या नियोजनातील त्रुटीचा फटका विभागातल्या रहिवाशांना बसत आहे. (प्रतिनिधी)