सिडकोचा वाहनतळ अवजड वाहनांना आंदण, सिडको, महापालिकेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:12 AM2021-02-01T02:12:14+5:302021-02-01T02:12:51+5:30
नवी मुंबईत सिडकोने दिलेल्या जमिनींचा फार मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. वाशी सेक्टर ३० येथे तुंगा हॉटेल प्रा. लि. या हॉटेल साखळी चालविणाऱ्या व्यवस्थापनाला हॉटेल उभारण्यासाठी विस्तीर्ण असा भूखंड दिलेला आहे.
नवी मुंबई : वाशी येथील तुंगा हॉटेलच्या समोरील सिडकोच्या पे अॅण्ड पार्कमध्ये मागील काही दिवसांपासून ट्रक, ट्रेलर व कंटेनर अशा अवजड वाहनांनी शिरकाव केला आहे. विशेष म्हणजे मागील अनेक दिवसांपासून ही वाहने एकाच जागेवर उभ्या असून, या प्रकाराला संबंधित विभागाचा अर्थपूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा सुरू आहे.
नवी मुंबईत सिडकोने दिलेल्या जमिनींचा फार मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. वाशी सेक्टर ३० येथे तुंगा हॉटेल प्रा. लि. या हॉटेल साखळी चालविणाऱ्या व्यवस्थापनाला हॉटेल उभारण्यासाठी विस्तीर्ण असा भूखंड दिलेला आहे. या हॉटेलसमोर सिडकोच्या मोकळ्या जागा आहेत. त्यातील आठ हजार चौरस मीटरची जमीन या हॉटेलला भाड्याने दिली. हॉटेलमध्ये येणाऱ्या वाहनांबरोबरच जनतेच्या वाहनांनादेखील या जागेत पार्किंग देण्याचे बंधनकारक करण्यात आले होते; पण हॉटेल व्यवस्थापनाने या जमिनीला रीतसर कुंपण घालून ही जागा त्यांचीच असल्याचा दिखावा तयार केला होता.
त्याचबरोबर या ठिकाणी पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनांना सिडकोच्या निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकारला जात असल्याचे दिसून येत होते. या ठिकाणी पब्लिक पार्किंगला मज्जाव केला जात असल्याने या हॉटेलची मक्तेदारी असल्याचे चित्र होते. या हॉटेलच्या या मनमानीविरोधात वाशीतील समाजेसेवक संदीप ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर सिडकोच्या तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी तुंगा हॉटेलला दिलेली आठ हजार चौरस मीटर मोकळी जागा काढून घेतली होती. त्या जागेवर सर्वसामान्य वाहनधारकांसाठी पे अॅण्ड पार्क उभारले होते. परंतु, कोविडच्या आडून या पे अॅण्ड पार्कचा वेगळाच वापर सुरू असल्याचे दिसत आहे.
खासगींना प्रवेश नाहीच
सध्या या पे अॅण्ड पार्कमध्ये अवजड वाहने तळ ठोकून उभी आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खासगी वाहनांना येथे प्रवेश मिळताना दिसत नाही. या प्रकाराला सिडको व महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.