कमलाकर कांबळेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : गेल्या सहा-सात महिन्यांपासून घरांचा हप्ता की घरभाडे, अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या सिडकोच्या लाभार्थ्यांना घराचा ताबा घेण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अंतिम टप्प्यात आलेल्या या गृहप्रकल्पांची शेवटच्या टप्प्यातील कामे पुन्हा रखडली आहेत. त्यामुळे घराचा ताबा देण्याची प्रक्रिय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडकोने आतापर्यंत चोवीस हजार घरांची योजना जाहीर केली आहे. यात यशस्वी ठरलेल्या सुमारे अकरा हजार ग्राहकांना ऑक्टोबर २०२० आणि मार्च २०२१ या दोन टप्प्यात ताबा देण्याचे जाहीर केले होते; परंतु कोरोना आणि इतर कारणांमुळे ग्राहकांना घराचा ताबा मिळाला नाही. हवालदिल झालेल्या ग्राहकांना सिडकोने जूनची डेडलाइन दिली. मात्र, फेब्रुवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. टाळेबंदीच्या धास्तीने मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे. त्यामुळे सुरू असलेल्या अनेक विकास प्रकल्पांच्या कामाला ब्रेक लागला आहे. सिडकोच्या गृहप्रकल्पांची कामेसुद्धा ठप्प पडली आहेत. याचा परिणाम म्हणून लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सिडकोच्या संगणकीय सोडतीत यशस्वी ठरलेल्या ग्राहकांना कागदोपत्री संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ताबापत्रेही वाटप करण्यात आली आहेत. समान सहा हप्त्यांत घराचे पैसे भरण्याच्या सूचना संबंधित ग्राहकांना देण्यात आल्या. त्यानुसार अनेक ग्राहकांनी बँका आणि विविध वित्तसंस्थांकडून कर्ज घेऊन सिडकोचे हप्ते अदा केले आहेत. घराचे हप्ते भरलेल्या ११ हजार ग्राहकांना रेरा कायद्यानुसार ऑक्टोबर २०२० आणि मार्च २०२१ अशा दोन टप्प्यात घरांचा ताबा देण्याचे सिडकोने जाहीर केले होते; परंतु कोरोना आणि इतर तांत्रिक कारणांमुळे सिडकोला ही डेडलाइन पाळता आली नाही; परंतु ग्राहकांच्या रेट्यानंतर जून २०२१ पासून टप्प्याटप्प्याने घरांचा ताबा देण्याचे सिडकोने जाहीर केले होते. मात्र, पुन्हा ताळेबंदी लागू झाल्याने हा मुहूर्त ही हुकण्याची शक्यता आहे.
ग्राहकांना दुहेरी भुर्दंडसिडकोच्या अनेक लाभार्थ्यांचे बँका व वित्तसंस्थांच्या कर्जाचे हप्ते सुरू झाले आहेत, तसेच स्वप्नातील घराच्या प्रतीक्षेत असलेले अनेक जण सध्या भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यामुळे बँकांच्या कर्जाचे हप्ते आणि घरभाडे असा दुहेरी भुर्दंड या ग्राहकांना सहन करावा लागत आहे. जूनमध्ये घराचा ताबा मिळाल्यास घरभाड्याचा भार कमी होईल, असे अनेकांना वाटत होते; परंतु कोरोनामुळे ही शक्यताही धूसर झाल्याने लाभार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.