सिडकोची मालमत्ता खरेदी प्रक्रिया झाली आणखी सुलभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:57 PM2020-02-10T22:57:39+5:302020-02-10T22:57:53+5:30
स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आता ऑनलाइन : व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते शुभारंभ
नवी मुंबई : सिडकोची मालमत्ता खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. घराचा ताबा घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मुद्रांक शुल्क आणि नोंदणी प्रक्रिया आता आॅनलाइन करण्यात आली आहे. सोमवारी या अत्याधुनिक प्रक्रियेचा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
सिडकोचे घर किंवा दुकान खरेदी प्रक्रिया पूर्ण करताना ग्राहकांची दमछाक होते. करारनामा झाल्यानंतर संब्ंधित ग्राहकाला हा दस्ताऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन मुद्रांक शुल्क भरून नोंदणी करावी लागते. त्यानंतरच घर किंवा दुकानांचा ताबा दिला जातो. मात्र सिडकोच्या पणन विभागाने आता ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन केली आहे. त्यामुळे अर्जदारांना दुय्यम निबंधक कार्यालयात खेटा माराव्या लागणार नाहीत. केंद्र सरकारच्या सूचना-विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या आय सरिता या सॉफ्टवेअरचा वापर करण्याचा निर्णय सिडकोच्या पणन विभागाने घेतला आहे.
सोमवारी लोकेश चंद्र यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पात दुकान प्राप्त झालेल्या एका अर्जदाराचे नोंदणी शुल्क या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आॅनलाइन भरण्यात आले.
सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अर्जदारांना एकाच ठिकाणाहून आॅनलाइन मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरून करारनामा नोंदणीकृत करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात सिडकोतर्फे विक्री करण्यात आलेल्या सदनिका व दुकानांचे करारनामे करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या दस्ताची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात न जाता, सिडकोच्या कार्यालयातूनच ई-रेजिस्ट्रेशन करता येणार आहे. या सॉफ्टवेअरमुळे अर्जदारांना त्यांची सदनिका अथवा दुकानाचा ताबा घेण्यापूर्वी आवश्यक प्रक्रिया जलद गतीने होणार आहेत.
सिडकोच्या माध्यमातून २०१८ मध्ये पंधरा हजार घरांचा गृहप्रकल्प जाहीर करून त्याची सोडत काढण्यात आली. तसेच नोव्हेंबर २०१९ मध्ये १० हजार घरांची सोडत काढण्यात आली. त्यातील पात्र अर्जदारांचे करारनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आय सरिता या सॉफ्टवेअरमुळे ताबा देण्याची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. पुढील काळात सिडकोच्या माध्यमातून आणखी दोन लाख दहा हजार घरे बांधण्यात येणार आहेत. त्यातील काही गृहप्रकल्पांच्या कामाला सुरुवातही करण्यात आली आहे.
सूचना-विज्ञान केंद्र व मुद्रांक शुल्क विभागाची मदत
मागील काही वर्षांत सिडकोच्या पणन विभागाने कात टाकली आहे. पणन विभागाशी संबंधित सर्व प्रक्रिया आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. अर्ज करण्यापासून ते करारनामा आणि शेवटच्या टप्प्यात ताबा घेण्याची संपूर्ण प्रक्रिया आता आॅनलाइन झाली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी ही किमया केली आहे.
मालमत्ता खरेदी प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजेच करारनामा आणि ताबा या गोष्टी सुलभ करण्याच्या दृष्टीने मागील काही महिन्यांपासून विविध पातळीवर चाचपणी सुरू होती. मुद्रांक शुल्क विभाग आणि केंद्र शासनाच्या सूचना-विज्ञान केंद्राच्या समन्वयातून या सॉफ्टवेअरचा अवलंब करण्यात आल्याचे पणन विभागाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी स्पष्ट केले आहे.
या सॉफ्टवेअरमुळे अर्जदारांचा वेळ वाचणार आहे. मुद्रांक शुल्क भरून नोंदणी करण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. महाराष्ट्रात या सॉफ्टवेअरचा अवलंब करणारे सिडको हे पहिले महामंडळ ठरले आहे.
- लोकेश चंद्र, सिडको