नवी मुंबई : सिडकोने येत्या काळात विविध घटकांसाठी ९० हजार घरे बांधण्याची घोषणा गेल्या वर्षी केली आहे. या नियोजित गृहप्रकल्पासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मे महिन्यात या गृहप्रकल्पांची सोडत काढण्याची योजना सिडकोने तयार केली होती; परंतु विविध कारणांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी सिडकोने १४८१३ घरांची योजना जाहीर केली. या प्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना या महिन्यात प्रत्यक्ष घरांचे ताबापत्र दिले जाणार आहे. या योजनेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केंद्र सरकारच्या ‘प्रत्येकाला घर’ या योजनेनुसार शहरात आणखी ९० हजार घरे बांधण्याचा निर्णय जाहीर केला.
शहरातील ट्रक टर्मिनल, बस डेपो तसेच रेल्वेस्थानक परिसरात ही घरे नियोजित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या गृहप्रकल्पांसाठी नवी मुंबईसह पनवेल परिसरातील जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सिडकोचे नियोजन आणि अभियांत्रिकी विभागाला या गृहप्रकल्पांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत; परंतु विविध कारणांमुळे हे काम अद्यापि कागदावरच सीमित राहिले आहे. लोकसभा निवडणुकीमुळेही या कामाची गती मंदावल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी पुढील काही महिन्यांत या महागृह प्रकल्पातील घरांची सोडत जाहीर होण्याची शक्यता सिडकोच्या सूत्राने व्यक्त केली आहे.