नवी मुंबई : सिडकोने गृहबांधणीवर आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येत्या काळात विविध आर्थिक स्तरांतील घटकांसाठी सिडकोघरे बांधणार आहे. त्यामुळे आपल्या प्रस्तावित ८८ हजार घरांच्या प्रकल्पात लहान घरांबरोबरच मोठ्या आकाराची घरेसुद्धा सिडको बांधणार आहे. मागील दोन वर्षांत सिडकोने सुमारे २४ हजार घरांची योजना जाहीर केली आहे. वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि तीन लाखांच्या वर वार्षिक उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गट या दोनच प्रवर्गांचा यात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे इतर आर्थिक गटांत मोडणाऱ्या घटकांना यात संधी मिळाली नाही. शिवाय मोठ्या क्षेत्रफळांच्या घरांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे बजेटमधील छोट्या घरांबरोबरच मोठ्या घरांचीसुद्धा निर्मित्ती करण्याचा निर्णय आता सिडकोने घेतला आहे. यापूर्वी ग्राहकांचा आर्थिक स्तर लक्षात घेऊन २५ चौ.मी. आणि २८ चौ.मी. क्षेत्रफळाच्या घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांची निराशा झाली होती. परंतु आता मोठ्या आकाराच्या घरांचीसुद्धा निर्मिती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार आपल्या प्रस्तावित ८८ हजार घरांच्या गृहप्रकल्पात २५ चौरस मीटर ते ४0 चौरस मीटर क्षेत्रफळाची घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सर्व आर्थिक स्तरातील ग्राहकांना घर घेण्याची संधी मिळावी या उद्देशाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
सिडकोच्या प्रस्तावित गृहप्रकल्पात मोठ्या घरांचाही आता हाेणार समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 1:06 AM