सिडकोची कामोठेत कारवाई, अनधिकृत फेरीवाल्यांची बाजारपेठ उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:17 AM2017-11-24T02:17:36+5:302017-11-24T02:17:52+5:30
पनवेल : कामोठेमधील सिडकोच्या भूखंडावर बेकायदा अतिक्र मण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत भाजी व मच्छी बाजारावर सिडकोने बुधवारी बुलडोझर फिरवत सर्व दुकाने जमीनदोस्त केली.
पनवेल : कामोठेमधील सिडकोच्या भूखंडावर बेकायदा अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत भाजी व मच्छी बाजारावर सिडकोने बुधवारी बुलडोझर फिरवत सर्व दुकाने जमीनदोस्त केली. या कारवाईदरम्यान कोणताही विरोध होऊ नये म्हणून सिडकोकडून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता. सिडकोच्या अनधिकृत बांधकामाविरोधात विभागाच्या सततच्या कारवाईने अनधिकृत बाजार चालविणा-या राजकीय नेत्यांची भंबेरी उडाली आहे. पनवेल महानगरपालिकेने पालिकेत समाविष्ट केलेल्या सिडकोच्या मालकीचे भूखंड मोकळे करून देण्याचा निर्णय घेतल्याने सिडको अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली आहे. या धडक कारवाईत अनधिकृत मंदिरेही जमीनदोस्त झाली. त्याप्रमाणे सिडकोने कारवाई सुरूच ठेवत आपल्या मालकीच्या कामोठे पोलीस स्टेशनजवळील सेक्टर ११, २१ व रेल्वे स्थानकाजवळील भूखंडावर अनधिकृतपणे उभी केलेल्या भाजी, मच्छी व शेकडो दुकानांवर कारवाई करताना संपूर्ण बाजारच जमीनदोस्त केला. व्यापाºयाकडून पुनर्वसनाची मागणी करण्यात येत होती. मात्र, येथील बाजार काही राजकीय व्यक्तींकडून आर्थिक व्यवहार होऊन चालविण्यात येत असल्याने सिडको अधिकाºयांनी सर्व दुकाने जमीनदोस्त केली.
या कारवाईत सिडकोच्या वतीने अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक शिवराज पाटील, नियंत्रक अधिकारी दीपक जोगी, सहायक नियंत्रक अधिकारी एस. आर. राठोड, कार्यकारी अभियंता ए. बी. रसाळ, बीट अधिकारी सुनील कर्पे, बी. झेड. नामवाड, आर. एस. चव्हाण, सहायक नियंत्रक अमोल चव्हाण, सुरक्षा अधिकारी सुरवटे, गोसावी, कळंबोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईक उपस्थित होते.