नवी मुंबई : पारदर्शक व गतिमान कारभाराच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून सिडकोच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. विशेषत: सिडकोच्या वसाहत विभागाशी सर्व सेवा १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन होणार आहेत, त्यामुळे नागरिकांचा पैसा आणि वेळेची बचत होणार आहे.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मागील वर्षभरात सिडकोचा कारभार गतिमान व पारदर्शक करण्यावर भर दिला आहे. तारण ना हरकत प्रमाणपत्र, कायदेशीर वारस हस्तांतर, विविध प्रकारचे परवाने आदीसाठी नागरिकांना वसाहत विभागात खेटा माराव्या लागतात. या विभागात वर्षानुवर्षे पोसले गेलेले अर्थकारण, त्यामुळे कामासाठी होणारा विलंब आदीमुळे नागरिकांत नाराजी आहे.
यासंदर्भात वाढत्या तक्रारीची दखल घेत लोकेश चंद्र यांनी सर्वप्रथम वसाहत विभागाचा संपूर्ण कारभार ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता १ नोव्हेंबरपासून या सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. याअंतर्गत विविध परवानग्यांसाठीआता ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच त्यासाठी लागणारे शुल्कसुद्धा ऑनलाइन स्वीकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या प्रक्रियेत आवश्यक कादपत्रांची संख्यासुद्धा कमी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वसाहत विभागातील काही सेवा यापूर्वी ऑनलाइन करण्यात आल्या आहेत.
या सेवांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत विविध परवानग्यासाठी आतापर्यंत जवळपास २३ हजार आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. नागरिकांचा मिळणारा हा प्रतिसाद पाहून सिडकोने आता वसाहत विभागाच्या सर्व सेवा १ नोव्हेंबरपासून आॅनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरी सुविधा केंद्र होणार बंद
नागरिकांच्या सोयीसाठी सिडकोने विविध नोडमध्ये नागरी सेवा केंद्र सुरू केली होती. या केंद्रामार्फत वसाहत विभागाशी संबंधित विविध सेवा अर्ज स्वीकारले जात होते. मात्र, १ नोव्हेंबरपासून सर्व नागरिक सुविधा केंद्र बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यामुळे अर्जदारांना आता आवश्यक कागदपत्र स्कॅन करून आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वसाहत विभागाशी संबंधित परवानग्या व ना हरकत प्रमाणपत्र अर्जदारांना त्यांच्या ईमेलवर पाठविण्यात येणार आहेत.