नवी मुंबई : सिडकोची परवानगी न घेता रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आठ कोयना प्रकल्पग्रस्तांना खारघर येथे वाटप केलेल्या २४ एकर जागेच्या खरेदी-विक्रीवरून निर्माण झालेल्या वादावर सिडकोने मौन धारण केले आहे. यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यास सिडकोच्या संबंधित अधिका-यांनी नकार दिला आहे.रायगड जिल्हाधिका-यांनी सिडको अधिग्रहित क्षेत्रातील खारघर परिसरातील सर्व्हे क्रमांक १८३ मधील २४ एकर जमीन आठ कोयना प्रकल्पग्रस्तांना दोन महिन्यांपूर्वी वाटप केली आहे. सुमारे १६०० कोटी रुपये बाजारभाव मूल्य असलेली ही जमीन अवघ्या तीन कोटी रुपयांत कोयना प्रकल्पग्रस्तांकडून मनीष भतीजा आणि संजय भालेराव या दोन विकासकांनी खरेदी केली. विशेष म्हणजे, हा व्यवहार केवळ २४ तासांत पूर्ण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने सोमवारी केला होता. या व्यवहारात सिडकोची कोणतीही परवानगी घेतली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात सिडकोकडून मात्र चुप्पी साधण्यात आली आहे. दरम्यान, या जमिनीचे वाटप करण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात सिडकोची ना हरकत घेणे गरजेचे होते; परंतु तशी कोणतीही कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झाली नसल्याची माहिती सूत्राने दिली. त्यामुळे या जमीनवाटप घोटाळ्यात सिडकोचा कोणताही संबंध येत नसल्याचे या सूत्राने स्पष्ट केले आहे.५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार-लाडकाँग्रेस पक्षाने केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. काँग्रेस, संजय निरूपम आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात ५०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. ती सिडकोची जमीन नाही, जिल्हाधिकाºयांनी दिलेली आहे. काँग्रेसची पायाखालची वाळू सरकत आहे, म्हणून बेफाम आरोप केले जात असल्याचे लाड यांनी सांगितले. लाड यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळले.
खारघरमधील ‘त्या’ जमीनवाटपाबाबत सिडकोचे मौन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 11:30 PM