सिडकोच्या विविध ऑनलाइन सेवा एकाच पोर्टलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:42 PM2020-06-01T23:42:56+5:302020-06-01T23:43:01+5:30
‘संवाद सिटीझन’ पोर्टल सुरू : अत्याधुनिक प्रणालीमुळे दिलासा
नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन सेवा अधिक सुकर आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने सिडकोने संवाद सिटीझन पोर्टल या अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब केला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते सोमवारी पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला.
डिजिटायझेशन व सिटीझन्स फ्रेंडली कामकाजाच्या दिशेने संवाद सिटीझन पोर्टल हे सिडकोचे आणखीन एक महत्त्वाकांक्षी पाऊल असल्याचे लोकेश चंद्र यांनी म्हटले आहे. सिडकोच्या सर्व आॅनलाइन सेवा आता या पोर्टलच्या माध्यमातून एकत्रितरीत्या, एकाच ठिकाणी, एका क्लिकवर घरबसल्या उपलब्ध होणार आहेत.
लॉकडाउनच्या काळात नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला आहे. लॉकडाउनमुळे संवाद सिटीझन पोर्टलच्या अनावरणाचा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडला.
सिडको महामंडळाने यापूर्वीच आपल्या बहुतांश सेवांचे डिजिटलीकरण करून या सेवा आॅनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांमध्ये आॅनलाइन आरटीआय (माहिती अधिकार), आॅनलाइन तक्रार निवारण, आॅनलाइन पेमेंट गेटवे, वसाहत विभागाच्या विविध सेवा, पाणी देयक भरणा, सेवा शुल्क, दक्षता विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा आदींचा समावेश आहे. आॅनलाइन सेवांमुळे सिडकोच्या कामकाजात गतिमानता आली असून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे, मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोळी तसेच सिडकोतील सर्व विभागप्रमुख व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या अनावरण समारंभात सहभागी झाले होते.
च्विविध आॅनलाइन सेवांसाठी यापूर्वी नागरिकांना स्वतंत्ररीत्या लॉगइन करावे लागत असे. परंतु संवाद सिटीझन पोर्टलमुळे केवळ सुरुवातीला एकदाच नोंदणी करावी लागणार आहे.
च्नागरिकांना सिडको कार्यालय किंवा विभागीय कार्यालयांमध्ये न जाता, घरबसल्या केवळ एका क्लिकवर या सर्व आॅनलाइन सेवांचा लाभ या पोर्टलमुळे घेता येणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.