सिडकोच्या आरटीआय सेवेची वेबसाइट बंद, नागरिकांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:42 AM2019-05-03T01:42:08+5:302019-05-03T01:42:23+5:30
सिडकोने आपल्या संकेतस्थळावर माहिती अधिकारासाठी निर्माण केलेले संकेतस्थळ बंद असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वैभव गायकर
पनवेल : सिडकोने आपल्या संकेतस्थळावर माहिती अधिकारासाठी निर्माण केलेले संकेतस्थळ बंद असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जी माहिती घरबसल्या केवळ दहा रु पयांची ऑनलाइन फी भरून मिळते, त्या माहितीसाठी सध्याच्या घडीला सिडको कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत.
सर्वप्रकारची माहिती घरबसल्या उपलब्ध व्हावी, याकरिता शासनाने अनेक प्रक्रिया ऑनलाइन केलेल्या आहेत. नागरिकांना सरकारी कार्यालयात खेटे न मारता सहजरीत्या माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने ही ऑनलाइन आरटीआय वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. मात्र, सिडको प्रशासनाच्या मार्फत सुरू करण्यात आलेली ही ऑनलाइन वेबसाइट बंद असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, सिडकोने अभ्यंगतासाठी दुपारी २ ते ५ असा वेळ दिला आहे. नोकरदार माणसाला सिडकोने आखून ठरवलेली वेळ न परवडण्यासारखी आहे, अशा वेळी अनेक जण सिडकोच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन फी भरून हवी ती माहिती निर्धारित वेळेत मिळवून शकतात. मात्र, या संकेतस्थळावर पेमेंट गेटवे इज टेम्पररी नोट अव्हेलेबल फोर आयॉनलाइन आरटीआय अशी सूचना ठळकपणे दिसते, याकरिता तुम्ही वैयक्तिक पातळीवर कार्यालयाला भेट देऊन माहिती अधिकार अर्ज दाखल करू शकता. अशी सूचना ठळकपणे त्या ठिकाणी दिसते. मात्र, या बाबत माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिडकोच्या उदासीन धोरणामुळे आम्ही आमची सर्व कामे सोडवून सिडको कार्यालयात खेटे का मारावेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, वेळ काढून सिडको कार्यालय गाठल्यास अनेक वेळेला संबंधित विभागातील अधिकारी जागेवर उपलब्ध नसतो. अशा वेळी वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. नोकरी करणाऱ्यांना ही गोष्ट परवडणारी नसल्याने सिडकोने लवकरात लवकर ऑनलाइन माहिती अधिकार प्रक्रिया सुरू करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता शैलेश क्षीरसागर यांनी केली आहे.
दिल्लीस्थित केंद्र सरकारअंतर्गत विविध मंत्रालयातील माहिती घरबसल्या ऑनलाइन आरटीआयद्वारे मुंबईमध्ये उपलब्ध होत असेल तर सिडको सारख्या संस्थेद्वारे ऑनलाइन माहिती पुरविण्याबाबत उदासीनता का दाखविली जाते, असा संतप्त सवालदेखील माहिती अधिकार कार्यकर्ते क्षीरसागर यांनी केला आहे.
सिडकोचा कारभार ऑनलाइन व पारदर्शक करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरात लवकर ऑनलाइन आरटीआय प्रक्रिया सुरू केली जाईल. - प्रिया रातंबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको