सिडकोचा कुस्तीला ‘धोबीपछाड’
By admin | Published: July 20, 2015 02:48 AM2015-07-20T02:48:51+5:302015-07-20T02:48:51+5:30
गोल्फपासून क्रिकेटपर्यंत सर्व खेळांसाठी मैदाने उपलब्ध असणाऱ्या नवी मुंबईमध्ये कुस्तीची मात्र उपेक्षा सुरू आहे. एपीएमसीनंतर आता
नामदेव मोरे, नवी मुंबई
गोल्फपासून क्रिकेटपर्यंत सर्व खेळांसाठी मैदाने उपलब्ध असणाऱ्या नवी मुंबईमध्ये कुस्तीची मात्र उपेक्षा सुरू आहे. एपीएमसीनंतर आता नेरूळमधील आखाडाही बंद पडला आहे. अनधिकृतपणे बहुमजली इमारतींचे बांधकाम सुरू असताना गप्प बसणाऱ्या सिडकोने आखाडा अनधिकृत ठरवून कुस्तीची उपेक्षा सुरूच ठेवली आहे.
नवी मुंबईचे नियोजन करताना सिडकोने प्रत्येक नोडमध्ये उद्यान व मैदानाची व्यवस्था केली आहे. अनेक स्पोर्ट्स क्लबना नाममात्र दरामध्ये भूखंड दिले आहेत. गोल्फ कोर्स, क्रिकेट मैदान या आधुनिक खेळांसाठीही मैदाने उपलब्धता करून दिली आहे. परंतु महाराष्ट्राची खरी ओळख असणाऱ्या कुस्तीसाठी मात्र एकही आखाडा तयार करण्यात आलेला नाही. राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक नवी मुंबईमध्ये राहण्यासाठी आले आहेत. यामध्ये कुस्तीची आवड असणारे हजारो खेळाडू आहेत. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या माथाडी कामगारांना या खेळाची प्रचंड आवड आहे. पोलीस व इतर सरकारी आस्थापनांमध्ये अनेक कुस्ती खेळाडू कार्यरत आहेत.
विद्यमान खेळाडू व भविष्यात या खेळात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या खेळाडूंना सराव करण्यासाठी कुठेच जागा नाही. ही गैरसोय लक्षात घेऊन सम्राट स्पोर्ट अॅकॅडमीने नेरूळ सेक्टर ६ शुश्रूषा रुग्णालयाला लागून असलेल्या सिडकोच्या भूखंडावर तात्पुरता आखाडा तयार केला होता. त्यासाठी रीतसर भाडे भरून जागा ताब्यात घेतली होती. या मातीच्या आखाड्यात ५० ते ६० खेळाडू नियमितपणे सराव करण्यासाठी येऊ लागले होते.
तात्पुरत्या स्वरूपात आखाडा उपलब्ध झाल्यामुळे खेळाडूंनी जोरात सराव सुरू केला. परंतु अचानक एका निनावी पत्रावरून सिडकोने हा आखाडा अनधिकृत असून तो तत्काळ बंद करण्याचे आदेश सम्राट स्पोर्ट्स अॅकॅडमीला दिले. परिणामी काही दिवसांपासून आखाडा बंद झाला आहे. खेळाडूंचा सराव थांबल्यामुळे कुस्तीपटूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वास्तविक ज्या भूखंडावर हा आखाडा तयार करण्यात आला त्या ठिकाणी यापूर्वी काही बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. या भूखंडावर लेबर कॉलनी उभारली होती. त्यांच्यासाठी प्रसाधनगृह उभे केले होते. या जागेचा गोडाऊनप्रमाणे वापर सुरू केला होता. परंतु संबंधितांवर कधीही कारवाई करण्यात आलेली नाही. कुस्तीशौकिनांनी रीतसरपणे सिडकोकडून ही जागा तात्पुरत्या स्वरूपात मागितली. आदित्य बापू उनावणे यांनी जवळपास ५ लाख रुपये खर्च करून येथील सर्व कचरा हटवला. त्याठिकाणी मातीचा आखाडा तयार करण्यात आला. राज्यस्तरीय कुस्तीस्पर्धाही या मैदानात झाल्या. सिडको या भूखंडाच्या वापराविषयी धोरण निश्चित करेल तेव्हा तत्काळ भूखंड मोकळा करण्याचे लेखी देऊनही सिडकोने आखाडा बंद केल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.