सिगारेटची थोटकं अन् बाटल्यांचा खच! मैदानाबाहेर उघड्यावरच मद्यपान : तरुणाई नशेत धुंद
By नामदेव मोरे | Updated: January 21, 2025 10:57 IST2025-01-21T10:56:11+5:302025-01-21T10:57:16+5:30
Cold Play: ‘कोल्ड प्ले’ कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणाईकडून डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम परिसरात उघड्यावरच मद्यपान व धूम्रपान केले जात आहे. परिसरात सिगारेटची थोटके व मद्यपींच्या बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र आहे.

सिगारेटची थोटकं अन् बाटल्यांचा खच! मैदानाबाहेर उघड्यावरच मद्यपान : तरुणाई नशेत धुंद
- नामदेव मोरे
नवी मुंबई - ‘कोल्ड प्ले’ कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणाईकडून डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम परिसरात उघड्यावरच मद्यपान व धूम्रपान केले जात आहे. परिसरात सिगारेटची थोटके व मद्यपींच्या बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र आहे. तरुण-तरुणी नशेमध्ये असल्यामुळे नवी मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तीन दिवस ‘कोल्ड प्ले’चे आयोजन केले आहे. यासाठी देशभरातून रोज ५० हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक हजर राहात आहेत. प्रेक्षकांमध्ये तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. उरण फाट्याकडील पादचारी पूल ते एलपी बस स्टॉप व विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराबाहेर तरुणांचे जथ्थे उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामधील अनेकजण उघड्यावरच मद्यपान व धूम्रपान करत असल्याचेही पाहायला मिळाले.
पोलिस बंदोबस्त असूनही उघड्यावर धूम्रपान सुरू
रस्त्याच्या बाजूला, पदपथ व कचराकुंडीजवळ दारूच्या बाटल्यांचा खच दिसला. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असूनही उघड्यावर धूम्रपान व मद्यपान सुरू होते.
उघड्यावर मद्यपान करण्यास परवानगी दिली आहे का? असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत होते. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस मद्यविक्रीच्या दुकानात मद्य खरेदीसाठी गर्दी दिसली.
मागील बाजूला असलेल्या एमआरएफ दुकानासमाेरील कठड्यावरही अनेकजण मद्यपान करण्यास बसत आहेत.
१२ मोबाइल चोरीला
कोल्ड प्ले बँडच्या तालावर थिरकणाऱ्यांमध्ये मोबाइल चोरटे वावरत आहेत. पहिल्या दिवशी पाच मोबाइल चोरीच्या घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सात मोबाइल चोरीला गेले आहेत. त्यामध्ये पाच मोबाइल स्टेडियममधून, तर दोन परिसरातून चोरीला गेले आहेत.