सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : पर्यावरणाच्या अनुषंगाने शाडूच्या मूर्तीला प्राधान्य देणे आवश्यक असतानाही गणेशोत्सव मंडळांकडून पीओपीच्या मूर्तींचाच वापर होताना दिसत आहे. त्यामागे मंडळांमध्ये सुरू असलेल्या मूर्तीच्या उंचीच्या स्पर्धेचे कारण स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे प्रशासनाकडून मंडळांना मूर्तीच्या अनुषंगानेही सक्तीच्या अटी व शर्ती घालण्याची गरज भासत आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात यंदा सुमारे २५ हजार घरगुती तर ५०० सार्वजनिक मंडळांकडून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशोत्सव साजरा होत असताना इको फ्रेंडली मूर्तीला प्राधान्य देण्याचे आवाहन प्रतिवर्षी पालिकेसह पोलिसांकडून केले जाते. तलावातील तसेच खाडी व समुद्रातील पाण्याचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी या सूचना केल्या जातात. त्यानंतरही मंडळांकडून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींना प्राधान्य मिळत असल्याचे सार्वजनिक तसेच घरगुती मंडळांच्या पाहणीत दिसून येत आहे.
यावरून गणेशभक्तांकडून उत्सव साजरा केला जात असताना पर्यावरणाच्या मुद्याला बगल दिली जात आहे. परिणामी तलावांमध्ये तसेच खाडीत प्रदुषण वाढल्याचे पुढील काही दिवसात पहायला मिळते. असे प्रकार टाळण्यासाठी पालिकेने पर्यायी तलावांमध्ये गॅबियन वॉल बांधून तलावांचे विभाजन केले आहे. परंतु मंडळांमध्ये शाडूच्या मूर्तीला अथवा इतर पर्यायी मूर्तींचा वापर करण्यासंदर्भात जागरूकता करण्यात प्रशासनात उणिवा जाणवत आहेत.
पीओपीच्या गणेशमूर्तीला मंडळांकडून प्राधान्य मिळण्यामागे त्यांच्यात मूर्तीच्या उंचीवरून सुरू असलेल्या स्पर्धेचे कारण ठळकपणे दिसत आहे. परिणामी उत्सवातले सामाजिक भान हरपत असून, केवळ दिखाव्यासाठी चढाओढ केली जात आहे. त्याकरिता मुंबई,पेणसह इतर ठिकाणावरून मूर्ती आणल्या जात आहेत. मागील काही वर्षात शहरातील प्रत्येक नोडमध्ये मंडळांच्या संख्येत वाढ झालीआहे. चढाओढीच्या स्पर्धेतून कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली तसेच इतर नोडमध्ये अवघ्या १०० ते ५०० मीटर अंतरावर गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहे. त्या सर्वांकडून मूर्ती आकर्षक तसेच अधिकाधिक सर्वाधिक उंचीची असावी याकरिता पीओपीच्या मूर्तींना प्राधान्य मिळत आहे. त्यात पालिकेच्या तसेच पोलिसांच्या स्पर्धेत सहभाग घेवून पारितोषिके मिळवणाऱ्या मंडळांचाही समावेश आहे. तर मागील वर्षापासून प्लॅस्टिक बंदी लागू झाल्याने, केवळ इको फ्रेंडली देखावे तयार केले जावू लागले आहेत. त्यांच्याकडूनच इको फ्रेंडली मूर्तीला मात्र नापसंती मिळत आहे.सार्वजनिक तसेच सोसायट्यांमधील सुमारे ५०० गणेशोत्सव मंडळांपैकी अवघ्या ८ ते १० मंडळांकडून इको फ्रेंडली मूर्तींचा वापर करण्यात आलेला आहे. पूर्णपणे कागदापासून अथवा शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींचा त्यांच्याकडून वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये नेरुळच्या भीमाशंकर सार्वजनिक उत्सव मंडळ, ऐरोलीतील सुयोग गणेशोत्सव मंडळ, कोपरखैरणेतील शिवशंभो मित्र मंडळ, सानपाडा येथील नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ आदी मंडळांचा समावेश आहे. उर्वरित मंडळांमध्ये शाडूच्या मूर्ती वापरण्याबाबत जनजागृतीची गरज आहे.मंडळांकडून स्पर्धेच्या अट्टाहासापोटी जादा उंचीच्या मूर्तींना महत्त्व दिले जात आहे. कोपरखैरणे परिसरात हे चित्र अधिक पहायला मिळत आहे. अवघ्या दहा ते बारा फूट रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा तीन ते चार मजली घरे आहेत. त्यापैकी अनेकांनी वरच्या भागात बाहेरच्या बाजूला बांधकामे वाढवलेली आहेत. यामुळे तिथल्या मंडळांकडून अरुंद गल्ली बोळातून १२ ते १५ फुटाच्या मूर्तींची आगमन व विसर्जनाची मिरवणूक होत असताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय जागोजागी लटकणाºया केबल तसेच विद्युत वायरींमुळेही धोका उद्भवत आहे. यानंतरही मंडळांमध्ये त्याचे गांभीर्य व पर्यावरणपूरक मूर्तींना महत्त्व याकडे दुर्लक्ष होत आहे.