उकाडा वाढल्याने नागरिक हैराण, तापमानात सात अंशांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:41 AM2018-01-17T01:41:03+5:302018-01-17T01:41:07+5:30
गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील थंडी गायब झाली असून, तापमानाचा पारा जवळपास सात अंशांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यात असलेला २९ अंशावरील पारा मंगळवारी ३५ अंशावर गेला आहे
नवी मुंबई : गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील थंडी गायब झाली असून, तापमानाचा पारा जवळपास सात अंशांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यात असलेला २९ अंशावरील पारा मंगळवारी ३५ अंशावर गेला आहे. वाढती उष्णता व हवेतील आर्द्रतेचे वाढते प्रमाण यामुळे नवी मुंबईकर घामाघूम झाले आहेत. शहरातील किमान तापमान २४ अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे, तर कमाल तापमान ३५ अंशावर पोहोचले आहे. संक्रांतीनंतर वातावरणात झालेला बदल पाहता नागरिकांना हिवाळ्यातही उकाडा सहन करावा लागणार असल्याचे चित्र दिसून आले.
जानेवारी महिन्यात राज्यभर गुलाबी थंडी पसरते. यंदा मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान असून, तापमानात वाढ झाल्याने हिवाळ्यातही उकाडा अनुभवयास मिळत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस थंडी अनुभवायला मिळाली. मात्र, त्यानंतर हवामानात झालेल्या बदलामुळे किमात तापमानात वाढ झाली. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी टोपी, छत्री, स्कार्फ, गॉगलचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून, शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये याकरिता द्रव पदार्थांचे सेवन करणे अधिक गरजेचे आहे, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. या उन्हामुळे डोकेदुखी, अंगदुखी तसेच शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होणाºया आजारांचे प्रमाण वाढल्याची माहिती डॉ. सुनित पेटकर यांनी दिली. कामानिमित्त ११ ते ४ या वेळेत बाहेर असणाºया व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, शक्यतो या वेळेत बाहेर पडू नये, असेही पेटकर यांनी सांगितले.