आंबेडकर स्मारकासाठी नागरिक आक्रमक
By admin | Published: January 26, 2017 03:38 AM2017-01-26T03:38:45+5:302017-01-26T03:38:45+5:30
ऐरोलीतील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामुळे शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पालिका आयुक्त तुकाराम
नवी मुंबई : ऐरोलीतील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामुळे शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी जनतेने २६ जानेवारीला वाशी शिवाजी चौकात मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेली लोकशाही व्यवस्था मोडीत काढली जात असल्याने प्रजासत्ताक दिनादिवशी मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बलचे आच्छादन करण्याचा निर्णय मार्च २०१६ च्या सर्वसाधारण सभेने घेतला होता. पण डोमला मार्बल लावणे योग्य होणार नसल्याचे कारण देवून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १४ जुलैला हा प्रस्ताव रद्द केला. मार्बल न लावण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेच्या खर्चात बचत झाल्याचे त्यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले होते. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. स्मारकाच्या खर्चात कपात केल्यास व मार्बल न बसविल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. काँगे्रसच्या नगरसेविका हेमांगी सोनावणे यांनी १६ आॅगस्टच्या सभेत लक्षवेधी सूचना मांडली. यावर चर्चा करताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करून मार्बलच बसविण्यात यावे अशा सूचना केल्या. सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्तांनीही मार्बल बसविण्याचे मान्य केले होते. पण प्रत्यक्षात यासाठीची कार्यवाही झालीच नाही. महापौर सुधाकर सोनावणे, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडे याविषयी पाठपुरावा केला होता. पण काहीही उपयोग झाला नसल्याने २६ जानेवारीला मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोळी आगरी महोत्सवासाठी १९ जानेवारीला ऐरोलीत आले होते. स्मारकाचे काम रखडल्याचे समजल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त करून आंदोलन उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर आंबेडकर स्मारक समितीने बैठका घेवून मूक निदर्शनाचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात विभागवार बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यघटनेने तयार केलेल्या लोकशाही मूल्यांची नवी मुंबईत पायमल्ली होत असल्याने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन व प्रशासनास इशारा देण्यासाठी हे आंदोलन असून यानंतरही स्मारकाचे काम सुरू झाले नाही तर १० फेब्रुवारीपासून उग्र आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)