नवी मुंबई : स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छता रनला शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला. स्पर्धेमध्ये तब्बल ५४०० नागरिकांनी सहभाग घेतला होता. पुरुष गटात विद्यानंद यादव व महिला गटात क्रांती साळवी यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
नेरुळमधील वझिराणी स्पोर्ट्स क्लब सर्कलपासून महापालिका मुख्यालयापर्यंत या स्पर्धेचे आयोजन केले होते. पाच किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये विद्यानंद यादव, योगेश राठोड, मनिलाल गावीत यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. महिलांच्या गटामध्ये क्रांती साळवी, साक्षीदेवी, माधुरी ताम्हाणे यांनी अनुक्रमे पहिला ते तिसरा क्रमांक मिळविला. लहान मुलांच्या गटात शुभम मल्लीक, हर्षल भगत, अथर्व देशमुख, मुलींच्या गटात लक्ष्मी यादव विजेती ठरली. ज्येष्ठ नागरिकांच्या गटात सूर्यकांत शेट्टी, दिव्यांग गटामध्ये बाबासाहेब कदम विजेते ठरले. दिव्यांग गटामध्ये हंसिका नाईक, पीयूष आणि ओम यांनाही बक्षीस देऊन गौरविण्यात आले. महापालिका अधिकारी व कर्मचारी गटामध्ये सतीश उगले, प्रशांत भोईर व सामाजिक संस्थेच्या गटामध्ये दीपक सिंग यांनी क्रमांक मिळविला. जर्मनीतील बर्लिन येथे नुकत्याच झालेल्या जागतिक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मराठमोळी नववारी नेसून, सहभागी झालेल्या गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतलेल्या मॅरेथॉनपटू क्रांती साळवी, गोव्याच्या किनाऱ्यावर म्युझिक अल्बमचे सहृदय वाडेकर, सिद्धी पाटणे व मनपाच्या जिंगलच्या गीतकार धनश्री देसाई यांनीही उपस्थिती दर्शविली होती.
या स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. प्लॅस्टिकचा वापर करू नका, असा संदेश देण्यात आला. या वेळी आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, मंदाकिनी म्हात्रे, आयुक्त रामास्वामी एन., रवींद्र इथापे, नेत्रा शिर्के, अनिता मानवतकर, गणेश म्हात्रे, जयाजी नाथ, विनोद म्हात्रे, प्रकाश मोरे, मीरा पाटील, सुनील पाटील, राजू शिंदे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील, शहर अभियंता मोहन डगावकर, घनकचरा व्यवस्थापनाचे उपआयुक्त तुषार पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.