नवीन पनवेल परिसरात तीव्र पाणीटंचाईने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 01:43 AM2019-05-04T01:43:07+5:302019-05-04T01:43:44+5:30
सिडकोविषयी नाराजी : आंदोलनाचा इशारा
कळंबोली : नवीन पनवेलमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचे सिडकोकडून निवारण होताना दिसत नाही. त्यामुळे येथील इमारतींना पुरेसे पाणी मिळत नाही. पाणीटंचाईवर मात करून अपुरा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सिडकोकडे केली आहे.
नवीन पनवेल सिडको वसाहतीत पाणीपुरवठा करण्यासाठी एमजेपीकडून मागणीप्रमाणे सिडकोला पाणी दिले जात नाही. याचे कारण म्हणजे जुनाट झालेल्या जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागले आहेत, तर टाटा पावर कंपनीकडून रविवारी आणि सुटीच्या दिवशी शटडाउन घेतला जातो. म्हणून एमजेपीला पाणी मिळत नाही. सध्या नवीन पनवेलमध्ये सर्वाधिक पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या वर्षभरापासून सिडको वसाहतीत पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी टाक्या सुद्धा नाहीत. त्यामुळे एमजेपीकडून मिळणाऱ्या पाण्यावर सिडको वसाहतींना अवलंबून राहावे लागते. सद्यपरिस्थिती तर खूपच हलाखीची झाली आहे. दोन ते तीन दिवसाआड पाणी येते. तेही केवळ अर्धा तास पाणी मिळते, तर सेक्टर १५ ते १६ पर्यंत पाणी पोहचेपर्यंतच पाणीपुरवठा बंद होतो, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. नवीन पनवेलला ४0 एमएलडीची गरज आहे, तर आता २८ एमएलडीच एमजेपीकडून पाणी येत आहे. त्याचबरोबर रविवार आणि महाराष्ट्र दिनाची सुटी असल्याने टाटा पावर कंपनीने शटडाउन घेतल्याने पाणीटंचाई भासत असल्याचे मत नवीन पनवेल सिडको पाणीपुरवठा अधिकारी राहुल सरवदे यांनी लोकमतला सांगितले.
माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी यांनी सांगितले की, नवीन पनवेलध्ये मुबलक पाणी मिळत नाही, तर कमी दाबाने पाणी मिळत आहे. तीन दिवसाआड पाणी येते. तेही फक्त अर्धा तासासाठी सिडकोकडून पाणीपुरवठा केला जातो. मुबलक पाण्यासाठी सिडको उपाययोजना करत नाहीत. या प्रश्नाबाबत आम्ही पाणीपुरवठा विभागाला उपाययोजनेसाठी पत्र दिले आहे.
टँकरद्वारेही पाणीपुरवठा नाही
एमजेपीकडून पाणीपुरवठा
कमी होत आहे. वारंवार जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. आता फक्त २८ एमएलडी पाणी मिळते. सुटीमुळे शटडाउन घेतल्यानेही पाणी मागणीपेक्षा पाणी कमी मिळते. पाणीटंचाई भासत असल्याने टँकरद्वारेही पाणीपुरवठा करता येत नसल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.