नवी मुंबईतल्या सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिक, फेरीवाल्यांची सर्रास वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 11:56 PM2020-09-06T23:56:14+5:302020-09-06T23:56:26+5:30

विभाग कार्यालयांमार्फत बॅनर बसवूनही लोकांच्या वर्तणुकीमुळे प्रादुर्भाव वाढण्याची भिती

Citizens and peddlers throng all the containment zones in Navi Mumbai | नवी मुंबईतल्या सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिक, फेरीवाल्यांची सर्रास वर्दळ

नवी मुंबईतल्या सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिक, फेरीवाल्यांची सर्रास वर्दळ

Next

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांची पायमल्ली होत आहे. या भागात नागरिकांची सर्रास वर्दळ असून, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांशिवाय दुकाने खुली करण्यात आली आहेत. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव

बेलापूर विभागातील सेक्टर ११ येथील एलोरा अपार्टमेंट हे कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सर्वच कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून, सोसायटीमधील नागरिक घराबाहेर पडत आहेत. फेरीवालेही अशा सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच व्यवसाय थाटत आहेत. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. बेलापूर विभागातील सेक्टर ५० नवीन येथील विनस कॉर्नर सोसायटीच्या प्रवेशद्वारावर पालिकेने बॅनर लावला आहे, परंतु सोसायटीच्या बाहेरील कपडे विक्रीची दुकाने सुरू असून, नागरिकांचीही वर्दळ सुरू आहे. नेरुळ सेक्टर २ मधील जयहिंद अपार्टमेंट या एलआयजी कॉलनीमध्येही जास्त प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. बैठी चाळ असलेल्या या भागात नागरिकांची वर्दळ सुरू असते.

विविध फेरीवाले या फिरत असून, खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. तुर्भे विभागातील सानपाडा सेक्टर ४ येथील अश्वथा सोसायटीमधील नागरिकही नियमांचे पालन करीत नसून, सोसायटीबाहेरील पदपथांवर चहाची टपरी, तसेच १०० मीटर परिसरातील पदपथांवर फेरीवाले बाजार मांडत आहेत. खरेदीसाठी नागरिकही गर्दी करीत असल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे प्रकार शहरातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली विभागातील सर्वच कंटेन्मेंट झोनमध्ये सुरू असून, याकडे महापालिका प्रशासन आणि पोलीस यांचे दुर्लक्ष झाले आहे.

फलक नावापुरते : महापालिकेने जाहीर केलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये संबंधित विभाग कार्यालयामार्फत सोसायट्यांना पत्र देण्यात आले असून, सोसायटीच्या प्रवेशद्वारावर अथवा रुग्ण आढळलेल्या घराजवळ फलक बसविण्यात येतात, परंतु कंटेन्मेंट झोनच्या नियमावलीचे पालन नागरिकांकडून केले जात नसून, महापालिकेच्या माध्यमातून प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमधील फलक नावापुरते राहिले आहेत.

झोन सील करण्याकडे दुर्लक्ष : कंटेन्मेंट झोन जाहीर झालेल्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ थांबावी, बाहेरील व्यक्ती या परिसरात येऊ नयेत, तसेच या परिसरातील व्यक्ती अत्यावश्यक काम किंवा सेवेसाठी बाहेर पडू नयेत, यासाठी सदर परिसर सील केले जात होते, परंतु ३१ आॅगस्ट रोजी महापालिकेने जाहीर केलेल्या कंटेन्मेंट झोनमधील परिसर सील केले जात नाहीत, त्यामुळे नागरिकांची वर्दळ नेहमीप्रमाणे सुरू आहे.

ज्या सोसायटी कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत, त्यांचे ये-जा करण्याचे मार्ग बंद करून त्या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. याबाबत जुन्या पोलीस आयुक्तांबरोबर बोलणे झाले होते. आता नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. शहरात ३३ कंटेन्मेंट झोन असल्याने मार्ग बंद करून त्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने कंट्रोल करणे शक्य आहे. याबाबत पोलीस आयुक्तांची चर्चा करून लवकरच कार्यवाही केली जाईल.
-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती घराबाहेर

लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींची घरे मोठ्या आकाराची असल्यास, त्यांना होम क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात येतात, परंतु अनेक व्यक्ती या नियमांचे पालन करीत नसून, घराबाहेर फिरत असल्याच्या तक्रारी सोसायट्यांमार्फत महापालिकेला प्राप्त होत आहेत.

Web Title: Citizens and peddlers throng all the containment zones in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.