खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:23 PM2019-07-01T23:23:45+5:302019-07-01T23:23:58+5:30
गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ग्रामीण भागात तासन्तास वीज गायब होत आहे. सोमवारी १ जुलै रोजी सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
पनवेल : गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ग्रामीण भागात तासन्तास वीज गायब होत आहे. सोमवारी १ जुलै रोजी सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
शुक्रवार, २८ जूनपासून दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे. मात्र दर दिवशी वीज पुरवठा खंडित होत आहे. जुनाट केबल, गंजलेले विजेचे खांब, उघड्या डीपी यामुळे वीज जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सतत वीज खंडित होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस देखील वीज पुरवठा खंडित होत असल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री कोणत्याही वेळी वीज गायब होत असल्याने नक्की वीज कोणत्या वेळेला असते असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. वारंवार वीज गायब होत असली तरी देखील वीज बिल कमी होण्याचे नाव घेत नाही. पनवेल तालुक्यात महावितरणचे लाखो वीज ग्राहक आहेत. मात्र दररोज त्यांना विजेचा लपंडाव सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील मोरबे कोंडले परिसरात दोन दिवसात विजेचा खांब पडल्याने त्यांना रात्रभर अंधारात राहावे लागले. तर शुक्रवारी ४ तास, शनिवारी ३ तास, रविवारी ४ तास व सोमवारी सकाळी ७ वाजता गेलेली वीज दुपारी १२ वाजता आली. तालुक्यातील गावांमध्ये वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना कित्येक तास विजेविना राहावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात वीज नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दिवसभरात १० ते १२ वेळा वीज गूल असते. सततच्या विजेच्या जाण्यामुळे विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत. दिवसा वीज जातेच शिवाय रात्री देखील वीज जात असल्याने व्यवस्थित झोप देखील मिळत नसल्याची व्यथा नागरिक मांडत आहेत. दिवसातील चार ते पाच तास वीज नसते. विजेची समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.