पनवेल - पनवेल तालुक्यातील मोहो गावाच्या परिसरात येथील बिबट्याने शिरकाव केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित घटनेची माहिती येथील ग्रामस्थांनी वनविभागाला देखील दिली असून वनविभागाने देखील या बिबट्याचा शोध सुरु केला आहे.
पनवेल तालुक्याचा विकास झपाट्याने होत चालल्याने नजीकच्या काळात मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याच्या घटना मोठ्या संख्येने घडत आहेत. मागील तीन दिवसांपासून गावाशेजारी बिबट्याच्या वावराने मोहो ग्रामस्थांची झोप उडाली आहे. याठिकाणच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे उमटल्याचे दावा देखील ग्रामस्थांनी केला आहे.दोन दिवसापूर्वी एका श्वानाला देखील या बिबट्याने आपला शिकार बनविल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यामुळे सायंकाळी येथील ग्रामस्थांनी घराबाहेर पडणे देखील बंद केले आहे.वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी डी एस सोनावणे यांनी या घटनेची दखल घेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या परिसरात केल्या आहेत. अद्याप बिबट्या कोणाच्याही नजरेस पडला नसला तरी आम्ही सावधानता म्हणून या परिसरात लक्ष ठेवून आहोत.