संप मागे घेतल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात नागरिकांची गर्दी
By वैभव गायकर | Published: March 21, 2023 12:31 PM2023-03-21T12:31:24+5:302023-03-21T12:31:39+5:30
मागील सहा दिवसांपासून जुनी पेन्शन याेजना लागू करण्याच्या मागणीसाठी महसूल विभागासह इतर विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर होते.
वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: मागील सहा दिवसांपासून जुनी पेन्शन याेजना लागू करण्याच्या मागणीसाठी महसूल विभागासह इतर विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर होते.सोमवारी दि.20 रोजी संप मिटल्याची घोषणा कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी शासकीय कामकाज सुरळीत झाले.सहा दिवसामुळे ठप्प झालेली कामे करण्यासाठी नागरिकांनी पनवेल तहसील कार्यालयात मोठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.
या संपाचा परिणाम शासनाच्या तिजोरीवर देखील पडला.संपामुळे मार्च अखेरच्या महसूल वसुलीच्या कामांना ब्रेक लागला आहे. संपामुळे प्रांत व तहसील कार्यालयांमध्ये शुकशुकाट कायम आहे. 14 मार्चपासून शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता.संपाचा महसूलच्या दैनंदिन कामकाजावर विपरित परिणाम झाला हाेता. यामध्ये विद्यार्थ्यांचे विविध दाखले ,बिनशेती प्रकरणे, फाैजदारी प्रकरणे, हद्दपार प्रकरणे, प्रतिज्ञापत्र साक्षांकन, महसूल संकलन, टपाल विभाग, अकस्मात मृत्यू प्रकरणे यासह पुरवठा विभागाशी निगडीत कामे ठप्प आहेत.एकीकडे शाळा प्रवेशाची धामधूम सुरु असताना त्यातच संप यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली होती.पनवेल तालुका रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचा व सर्वात जास्त महसूल गोळा करणारा तालुका आहे.या संपाचा परिणाम सर्वावर झाला आहे.संपामुळे प्रतिज्ञापत्र सारखी कामे रखडली होती.संप लांबणीवर पडल्याने आमच्या कामावर परिणाम झाला असल्याचे ऍडव्होकेट सचिन कांबळे यांनी सांगितले.
संप मागे घेतल्याने तहसील कार्यालयात विविध शाखांचे काम सुरळीत झाले आहे.नागरिकांची सर्व कामे यापुढे सुरळीत चालु राहतील. - विजय तळेकर (तहसीलदार,पनवेल)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"