लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लॉकडाऊन काळापासून अद्याप नेरुळमधील महापालिकेचे वंडर्स पार्क बंद आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून घरीच असलेल्या लहान मुलांचे विरंगुळ्याचे ठिकाण बंद असल्याने चिमुकल्यांचा हिरमोड होत आहे. प्रशासन उदासीन असल्याचा आरोप नागरिक करत असून नियमांचे पालन करून वंडर्स पार्क खुले करावे, अशी मागणी केली जात आहे.
शासनाच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता देण्यात आली असून, सर्व व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्याने, थिएटर, नाट्यगृह यासारखी विरंगुळ्याचे ठिकाणे बंद ठेवण्यात आली होती, परंतु हळूहळू सर्वच खुले करण्यात आले आहे. नवी मुंबई शहरातील शाळा, महाविद्यालये अद्याप बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अनेक लहान मुले गेल्या अनेक काही महिन्यांपासून घरी असून, कंटाळलेली आहेत. विविध खेळण्यांची सुविधा असलेले नेरुळमधील वंडर्स पार्क देखील अद्याप खुले करण्यात आलेले नाही, त्यामुळे लहान मुले आणि पालकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. नियमांचे पालन करण्यासाठी उपाययोजना करून वंडर्स पार्क सुरू करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
अनेक राइड्स नादुरुस्तn वंडर्स पार्कमधील ऑक्टोपस, फेसबी, क्रिकेट यासारखी अनेक राइड्स नादुरुस्त असल्याने बंद आहेत. महापालिकेकडून नव्याने विविध अत्याधुनिक राइड्स बसविण्यात येणार होती; परंतु त्याबाबत कोणतीही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.