नागरिकांची उदासीनता चोरट्यांच्या पथ्यावर

By admin | Published: October 17, 2015 02:11 AM2015-10-17T02:11:34+5:302015-10-17T02:11:34+5:30

पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये चोरी, घरफोडी, चेनस्नॅचिंग, वाहनचोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलिसांनी अनेक टोळ्या गजाआड केल्या तरी हे गुन्हे होतच असून

Citizens' depression on the path of thieves | नागरिकांची उदासीनता चोरट्यांच्या पथ्यावर

नागरिकांची उदासीनता चोरट्यांच्या पथ्यावर

Next

नामदेव मोरे, नवी मुंबई
पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये चोरी, घरफोडी, चेनस्नॅचिंग, वाहनचोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलिसांनी अनेक टोळ्या गजाआड केल्या तरी हे गुन्हे होतच असून, त्यास नागरिकांची उदासीनताही कारणीभूत आहे. वाहनांमध्ये सुरक्षा उपकरणांचा वापर होत नाही. घरांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष केले जात असून, चोरी झाल्यानंतर त्याचा दोष पोलिसांवर टाकला जात आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये गतवर्षी चोरीच्या एकूण १,४४७ घटना घडल्या होत्या. रोज सरासरी चार ठिकाणी चोरी झाल्याची नोंद आहे. वर्षभरामध्ये ६५४ वाहने व २९७ महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेले आहेत. वर्षभर ५४९ ठिकाणी घरफोडी झाली असून, यामधील १८६ गुन्हे दिवसा केले आहेत. चोरी करणाऱ्या टोळ्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. पोलीस आयुक्त प्रभात रंजन, उपायुक्त सुरेश मेंगडे, शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अनेक टोळ्या गजाआड केल्या आहेत. इतर राज्यांमध्ये जाऊनही अनेक चोरट्यांना अटक केली आहे. सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीवर मोक्का लावला आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. गुन्हे प्रकटीकरणाचे व गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण राज्यातील इतर शहरांपेक्षा नवी मुंबईमध्ये जास्त आहे. परंतु यानंतरही गुन्हेगारी पूर्णपणे थांबविण्यात पोलिसांना यश येत नाही. आयुक्तालय क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २० लाखांपेक्षा जास्त झाली असून, या परिसराच्या सुरक्षेसाठी फक्त चार हजार कर्मचारी तैनात आहेत. यामुळे सुरक्षेसाठी फक्त पोलिसांवर अवलंबुन राहणे थांबविले पाहिजे. नागरिकांनीही गुन्हेगारी थांबविण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
चोरी, घरफोडी झाली की नागरिक पोलिसांना दोष देतात. परंतु स्वत:च्या जबाबदारीचा मात्र नागरिकांनाही विसर पडत आहे. १० लाख ते ५० लाख रुपयांची गाडी खरेदी करणारे नागरिक त्या गाडीमध्ये पाच हजार रुपयांचे सुरक्षा उपकरण लावण्याचे टाळतात. ६० हजार ते १ लाख रुपयांची मोटारसायकल घेणारेही सुरक्षा उपकरणे लावत आहेत.
वाहनधारकांच्या निष्काळजीपणामुळे वाहनांची चोरी होत आहे. सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी महिलांनी पदपथावरून चालावे, रोडवरून उजव्या बाजूने चालावे, असे आवाहन केल्यानंतरही या सूचनांचे पालन केले जात नाही. २० लाख ते १ कोटी रुपयांचे घर खरेदी केले जाते. घराच्या सजावटीवरही लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु दरवाजाला तकलादू कडीकोयंडा बसविला जातो; सुरक्षा उपकरणे बसविली जात नाहीत. सोसायटीत सुरक्षारक्षक ठेवत नाहीत. बाहेरगावी गेल्यानंतर दागिने व रोख रक्कम घरातच ठेवली जाते. रोडवर कार उभी करून त्यामध्ये लॅपटॉप व इतर किमती वस्तू ठेवतात.
>> वाहनचोरी, घरफोडी व इतर चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी जनजागृती सुरू केली आहे. १ लाखापेक्षा जास्त पत्रके शहरात वाटली जाणार आहेत. १७ आॅक्टोबरला वाशीतील इनॉर्बिट मॉलमध्ये सुरक्षा उपकरणांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले असणार आहे. यामध्ये वाहनांमध्ये लावण्यात येणारे गीअर लॉक, व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम, घरातील दरवाजाला लावण्यासाठीची सुरक्षा उपकरणे, जादूटोणाविरोधी कार्यक्रम, दहशतवादासंबंधी माहिती, शस्त्र प्रदर्शन, अमली पदार्थ व वाहतूक सुरक्षेसंदर्भात जनजागृती कार्यक्रमहीदेखील अंतर्भूत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी केले आहे.
>>चोरी, घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या अनेक टोळ्या गजाआड करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा व प्रत्येक पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी गुन्हे रोखण्यासाठी व झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी मेहनत घेत आहेत. अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास तत्काळ लावला आहे. शहरातील गुन्हे थांबविण्यासाठी नागरिकांच्याही सहकार्याची गरज आहे. वाहनांमध्ये, घर व दुकानांमध्ये सुरक्षा यंत्रणा बसवावी. थोडीशी दक्षता बाळगली तर नक्कीच गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल.
- सुरेश मेंगडे,
पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

Web Title: Citizens' depression on the path of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.