- प्राची सोनवणेनवी मुंबई : केंद्र शासनाच्या आदेशानुसार महापालिकांचे जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करण्यावर भर दिला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही रोखविरहित व्यवहाराकरिता आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करूनही कॅशलेस व्यवहाराला अल्प प्रतिसाद मिळत आहे. एनएमएमसी ई-कनेक्ट या अॅपच्या माध्यमातून रोखरहित कर भरण्याचा पर्याय असतानाही रोज महापालिकेच्या विभाग कार्यालयासमोर आजही रांगा लावल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळते.नवी मुंबईकरांकडून कॅशलेस प्रणालीला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक वेळा महापालिकेच्या वतीने विभागीय स्तरावर जनजागृती करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या अंगवळणी ही पद्धत पडली नसून त्यांचा या व्यवहारांवर अद्याप विश्वास बसला नसल्याचे चित्र आहे. जे कॅशलेसच्या मागे लागले त्यांची केवळ दमछाक झाली आहे. नेटबँकिंग, बिलांचा आॅनलाइन भरणा असे व्यवहार शिकण्यासाठी तरुणांची मदत घेतली जात आहे. तरी देखील आॅनलाइन व्यवहारांविषयी नागरिकांमध्ये असलेल्या भीतीपोटी फारसे धाडस केले जात नाही. नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याकरिता अनेक योजना शासनाच्या वतीने राबविण्यात आल्या. मात्र, नवी मुंबई शहरातील प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर आजही रोखीने व्यवहाराकरिता नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळते.नागरिकांना मेल आणि अॅपवरून तक्रारी करण्याची संधी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांचे निराकरण संबंधित अधिकाºयांच्या पातळीवर केले जात आहे. या तक्रारींची दखल त्वरित घेतली गेली नाही तर वरिष्ठ अधिकाºयाकडे ती तक्रार आपोआप वर्ग होते. या वरिष्ठ अधिकाºयाकडेही तक्रार पडून राहिल्यास ती थेट आयुक्तांकडे जाते. चौकशीअंती आयुक्त संबंधित दोषी अधिकाºयावर वेतनवाढ रोखणे अथवा निलंबनाची कारवाई करण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जात आहे. ही प्रणाली महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून मोबाइल अॅपवरदेखील सुविधा आहे. या सुविधेमुळे आता एका क्लिकवर परवाने, जन्मनोंद या सेवा उपलब्ध झाल्या आहेत. परिवहन सेवेचे मासिक पास तिकीटदेखील आता मोबाइल प्रणालीवर उपलब्ध झाले आहेत. पीओएस यंत्राद्वारे ही सेवा देताना तिकिटाची व पासची रक्कम या यंत्राद्वारे कापली जाते. अशा प्रकारची सुविधा देणारी नवी मुंबई महानगरपालिका देशातील पहिली महापालिका असल्याचा दावा करण्यात आला होता.महापालिकेच्या वतीने कॅशलेस व्यवहारांवर भर देण्याकरिता पुरेपूर प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती, महत्त्वाच्या परिसरांमध्ये रोखविरहित व्यवहारांविषयीचे फलक देखील लावण्यात आले आहेत. आॅनलाइन व्यवहाराविषयी नागरिकांमध्ये असलेल्या भीतीपोटी आॅफलाइन व्यवहार केले जात आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन व्यवहारांचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आाहे. लवकरच बँकांना आॅनलाइन कलेक्शनची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.- धनराज गरड,मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महानगरपालिकाशुल्क कपातीची भीतीपेट्रोल पंपावर अजूनही पूर्णपणे कॅशलेस व्यवहार सुरू झाले नाहीत.गॅस सिलिंडरही रोख रक्कमेने खरेदी करावे लागतात.आॅनलाइन व्यवहाराचा मनस्ताप झाल्याचे साहेबराव चौधरी यांनी सांगितले.रेशन धान्य दुकानात नागरिकांना रोखीनेच व्यवहार करावे लागत आहेत. दुकानदारालाही यासाठी दुहेरी कसरत करावी लागते. त्याला बँकेत जाऊन चलन तयार करावे लागते. त्याआधारे मग तो शासनाकडून धान्याची खरेदी करू शकतो.अनेकदा डेबिट कार्डचा वापर करून व्यवहार करताना तांत्रिक अडचणी आल्याने नागरिकांना बँक खात्यातून पैसे कापले जाण्याचा फटका बसत आहे. त्यानंतर बँकेकडे तक्रार केली असता बँका देखील हात वर करत असल्याची प्रतिक्रिया विनय पाटील यांनी व्यक्त केली.दुकानदारही रोख रक्कम घेण्यास प्राधान्य देत असल्याने आपोआप रोखविरहित व्यवहाराला त्याचा फटका बसत आहे.
कॅशलेस प्रणालीकडे नागरिकांची पाठ, एनएमएमसी ई-कनेक्ट अॅपला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 7:06 AM