कारगिल युद्धाच्या शौर्य कथांनी डोंबिवलीकरांचे डोळे पाणावले
By अनिकेत घमंडी | Published: January 8, 2023 04:38 PM2023-01-08T16:38:26+5:302023-01-08T16:39:14+5:30
कॅप्टन योगेंद्र सिंह यादव ह्यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात उपस्थित डोंबिवलीकर नागरिक भारतीय सैनिकांच्या शौर्य कथा ऐकून नतमस्तक झाले.
डोंबिवली: भारताच्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने – परमवीर चक्राने गौरविण्यात आलेले सुभेदार मेजर आणि मानद कॅप्टन योगेंद्र सिंह यादव ह्यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात उपस्थित डोंबिवलीकर नागरिक भारतीय सैनिकांच्या शौर्य कथा ऐकून नतमस्तक झाले. कडाक्याची थंडी, प्रचंड वेगाने वाहणारे वारे, बर्फाचे थर आणि शत्रूच्या आग ओकणाऱ्या तोफा- बंदुकांची पर्वा न करता भारतीय सैन्याने टायगर हिल हे महत्वाचे ठाणे पाकिस्तानी घुसखोरांकडून परत कसे मिळवले याची रोमांचक कहाणी योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितली. असीम फाउंडेशन चे सारंग गोसावी यांनी प्रचंड संख्येने उपस्थित असणाऱ्या डोंबिवलीकर नागरिकांच्या वतीने योगेंद्र सिंह यांच्याशी संवाद साधला.
श्री गुरुदत्त को. ऑप. हाऊ. सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, असीम फाऊंडेशन, पुणे आयोजित “राष्ट्र आराधन – पुष्प पाचवे” “टायगर हिल ची लढाई” ह्या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली मधील नीलपद्म सभागृह येथे करण्यात आले होते. हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ह्या उद्देशाने नीलपद्म असोसीटस, हनुमान को.ऑप.हा.सोसा, कर्तव्य फाऊंडेशन, विवेकानंद सेवा मंडळ, ध्रुव नॉलेज वेलफेअर सोसायटी आशा संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.
सैन्यात असणाऱ्या आपल्या वडिलांच्या शौर्य कथा ऐकून प्रेरित होऊन, शाळेत असताना अवघ्या आठव्या इयत्तेपासून सैन्यात जाण्याचा ध्यास घेतलेले योगेंद्र सिंह केवळ १६ वर्षे ५ महिने इतक्या कोवळ्या वयात सैन्यात दाखल झाले. पाकिस्तानी घुसखोर द्रास आणि कारगिलच्या भागात उंचीच्या ठाण्यांवर कब्जा करून बसल्याचे आपल्या सैन्याला कळताच कारगिल युद्धाचा बिगुल वाजला. अवघ्या अठरा वर्षाचे योगेंद्र सिंह आपल्या १८ ग्रेनेडीयर्स च्या सहकाऱ्यांसह युद्धात उतरले. लेह-श्रीनगर च्या महामार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानने टायगर हिल हे मोक्याचे ठाणे काबीज केले होते. ते परत मिळवून आपल्या सैन्याची आणि नागरिकांची निश्चिंती करण्याची जबाबदारी इतर काही तुकड्यांबरोबर योगेंद्र सिंह यांच्या तुकडीला देण्यात आली.
सुरुवातीचे काही दिवस टायगर हिल च्या आजूबाजूची मोक्याची ठाणी मिळवणाऱ्या सहकाऱ्यांना शिबंदी पुरवण्याची अतिशय आव्हानात्मक जबाबदारी योगेंद्र यांना देण्यात आली होती. शत्रूच्या गोळीबाराची पर्वा न करता अक्षरशः दिवस-रात्र चालून त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडली. यावेळेचा दिसून आलेला ‘फिटनेस’ आणि त्यांचा मानसिक कणखरपणा लक्षात घेऊन प्रत्यक्ष टायगर हिल वर करण्याच्या चढाई मध्ये त्यांना ‘घातक’ तुकडीत (हल्ल्याच्या आघाडीवरची तुकडी) सामील करण्यात आलं. सलग ४८ तास रात्री रांगत –रांगत पुढे जाणे आणि दिवसा शत्रूच्या तीक्ष्ण नजरेपासून जपून सुरक्षित राहणे असे मार्गक्रमण करत ही १५ जणांची तुकडी अवघ्या काहीशे मीटर्स पर्यंत येऊन पोहोचली. दुर्दैवाने यावेळी शत्रूच्या नजरेत आल्यामुळे या तुकडीवर प्रचंड गोळीबार सुरु झाला, ज्यामुळे आघाडीचे ७ सैनिक एकटे पडले.
अशावेळी माघार न घेता लढाऊ बाण्याच्या आपल्या सैनिकांनी थेट आक्रमण करण्याचे ठरवले. शत्रूच्या तिखट प्रतिकाराला तोंड देताना योगेंद्र सिंह यांचे सहकारी एकेक करत मृत्युमुखी पडले. त्यांना स्वतःला सुद्धा अनेक गोळ्या लागल्या. अशा अवघड परिस्थितीत अतिशय शांत डोक्याने त्यांनी शत्रूच्या तुकडीला आपण मेल्याचे भासवून मग अचानक हल्ला चढवला. गोळीबारामुळे डावा हात शरीरापासून विलग झालेला असतानाही त्यांनी अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन करून शिल्लक पाकिस्तानी सैन्यास माघार घेण्यास भाग पडले. शत्रूच्या पुढच्या ठाण्यावर यापेक्षा जास्त शिबंदी आणि माणसे आहेत, हे लक्षात घेऊन योगेंद्र सिंह संपूर्ण जायबंदी अवस्थेत फक्त मनाच्या बळावर रांगत आपल्या अलीकडच्या तुकडी पर्यंत पोहोचले. प्रचंड रक्तस्त्रावामुळे ते कमजोर झाले होते, आणि त्यांना दिसायचेही बंद झाले होते. पण अशाही परिस्थितीत आपल्या ‘कमांडिंग ऑफिसर’ ला चकमकीची संपूर्ण माहिती देऊन, आणि शत्रूच्या तयारीचा अंदाज देऊनच ते बेशुद्ध झाले. त्यांच्या वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे भारतीय सैन्याने त्याच रात्री टायगर हिल चे ठाणे घुसखोरांपासून मुक्त केले.
या अतुलनीय कामगिरीसाठी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. योगेंद्र सिहांकडून या आठवणी ऐकताना उपस्थित सर्व लोक भारावून गेले होते. या रोमांचकारी शौर्य कथांनी ‘आपणही देशासाठी काहीतरी करावे’ ही स्फूर्ती नव्या पिढीला मिळावी, अशी माफक अपेक्षा योगेंद्र सिंहांनी व्यक्त केली. हे देशाचे काम आहे अशा कर्तव्य भावनेने सर्व आयोजकांनी या कार्यक्रमासाठी काम केले. डोंबिवलीकर नागरिकांनीही याला उस्फुर्त प्रतिसाद दिला. कर्तव्याला आभारांची गरज नाही, यामुळे कार्यक्रमाचा शेवट फक्त सामूहिक ‘वंदे मातरम’ गायनाने करण्यात आला. त्यावेळी माजी नगरसेवक राजन मराठे, ज्योती मराठे, विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित, अतुल पंडित, अनंत कर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.