रेशनिंगच्या धान्यासाठी नागरिकांची पायपीट, घोटाळा उघडकीस आल्याचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 01:30 AM2020-12-07T01:30:54+5:302020-12-07T01:33:00+5:30
Navi Mumbai News : लॉकडाउनच्या कालावधीत शासनाकडून नागरिकांना मोफत धान्य पुरविले जात होते. यावेळी घणसोली सिम्प्लेक्स येथील ४१४ क्रमांकाच्या शिधावाटप केंद्रात नागरिकांचे मोफत धान्य त्यांना न देता अपहार झाला होता.
नवी मुंबई : घणसोली सिम्प्लेक्स परिसरातील नागरिकांना रेशनिंगच्या धान्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. शिधावाटप केंद्रातील घोटाळा उघडकीस आल्यानंतर तिथले केंद्र विभागाबाहेर हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुन्हा त्याच चालकाकडे केंद्र सोपवून भ्रष्ट कारभाराची पोचपावती दिल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
लॉकडाउनच्या कालावधीत शासनाकडून नागरिकांना मोफत धान्य पुरविले जात होते. यावेळी घणसोली सिम्प्लेक्स येथील ४१४ क्रमांकाच्या शिधावाटप केंद्रात नागरिकांचे मोफत धान्य त्यांना न देता अपहार झाला होता. याबाबत तक्रारी प्राप्त होताच शिधावाटप विभागाने पाहणी केली असता, अपहार झाल्याचे उघड झाले. त्यानुसार, तत्काळ या केंद्राला टाळे ठोकण्यात आले. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ त्या ठिकाणी दुसरे केंद्र सुरू करणे आवश्यक होते. त्याऐवजी घणसोली सेक्टर ७ मधील रहिवाशांसाठी सेक्टर १ येथे नवे केंद्र करण्यात आले. यामध्ये सर्वसामान्यांची चांगलीच पायपीट होत आहे.
विशेष म्हणजे नव्याने सुरू करण्यात आलेले केंद्र पूर्वी ज्या व्यक्तीमार्फत केंद्र चालविले जात होते, त्याच्याच स्वाधीन करण्यात आले आहे. शासकीय धान्यात अपहार झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्याला बगल देत, शिधावाटप विभागाने केवळ दुकानाला टाळे ठोकून नव्या ठिकाणी दुकान थाटण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे शिधावाटप विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे, तर यामागे अर्थपूर्ण संबंध असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी, नागरिकांनी घोटाळा उघडकीस आणला, म्हणून त्यांनाच पायपीट करण्याची शिक्षा देण्याची भूमिका शिधावाटप विभागाने बजावल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.