कळंबोली : कामोठे वसाहतीत महानगर गॅसची पाइपलाइन टाकण्याकरिता ठेकेदाराकडून खोदकाम करण्यात येत आहे. खोदकाम झालेल्या जागेची व्यवस्थित डागडुजी न झाल्यामुळे कामोठेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर खोदलेल्या रस्त्यावर पावसामुळे चिखल तयार झाला आहे. यातून दुचाकीस्वार घसरून अपघात घडत आहेत. तर संध्याकाळी वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. खोदलेल्या भागावर डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पनवेल आणि सिडको वसाहतींमध्ये आता पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा केला जाणार आहे. त्यानुसार महानगर गॅसने बऱ्याच ठिकाणी गॅस वाहून नेणाºया वाहिन्या टाकल्या आहेत. त्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. खारघरनंतर खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे वसाहतीमध्ये महानगरच्या गॅसवाहिन्या जमिनीखाली टाकण्यात येत आहेत. त्यासाठी सिडकोची परवानगीसुद्धा घेण्यात आली आहे. यासाठी महानगर गॅसने सिडकोकडे रस्त्याचे खोदकाम आणि तोडफोड केल्यामुळे त्याबदल्यात पैसेसुद्धा भरलेले आहेत. त्यानुसार सिडकोने खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. परंतु ते न केल्यामुळे आजच्या घडीला अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
कामोठे सेक्टर ६ए येथे प्रवेशद्वारापासून ते शिवसेना शाखेपर्यंतच्या रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल तयार झाला आहे. रस्त्याबरोबर लेवलिंग न केल्यामुळे दुचाकीस्वार घसरून छोटे-मोठे अपघात घडत आहेत. संध्याकाळी अंधारात खोदकाम केलेला रस्ता दिसत नाही; त्यामुळे वाहतूककोंडीबरोबर अपघातांत भर पडली आहे. सिडकोने या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.कामोठेकरांची खड्ड्यांतूनच वाटचालकामोठे वसाहतीत रहिवासी खड्ड्यांमुळे अगोदरच त्रस्त आहेत. गेल्या महिन्यात एकता सामाजिक संस्थेकडून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आता त्या खड्ड्यांबरोबर महानगर गॅसच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांची भर पडली आहे. याबाबत सिडकोकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत.