उरण, पनवेल : शहर व ग्रामीण भागामध्ये तापाची साथ पसरू लागली आहे. पनवेलमध्ये आतापर्यंत ३४ रुग्ण आढळून आले असून, उरणमध्ये २५ पेक्षा जास्त डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाकडून योग्य उपाययोजना होत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.उरण शहर आणि ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून ताप, सर्दी, थंडी खोकल्याबरोबरच डेंग्यूच्या रु ग्णात वाढ झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात उघडे नाले, गटारे आणि सांडपाणी यांच्यावर आरोग्य विभागाकडून नियमित औषध फवारणी केली जात नाही. यामुळे साथीचे आजार वाढू लागले आहेत. आतापर्यंत शहर व ग्रामीण परिसरामध्ये २५ पेक्षाही अधिक डेंग्यूचे रु ग्ण आढळले आहेत.उरण शहरात तीन-चारच संशयित डेंग्यूचे रु ग्ण अद्याप तरी आढळून आले आहेत. त्यामुळे किमान उनपच्या हद्दीत तरी डेंग्यूची साथ नसल्याची माहिती इंदिरा गांधी ग्रामीण रु ग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक मनोज भद्रे यांनी दिली. तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या डेंग्यूच्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या डेंग्यूच्या रुग्णांची डॉक्टरांकडून देण्यात आलेल्या माहितीतून तरी फारशी आकडेवारी दिसून आलेली नसल्याची माहितीही भद्रे यांनी दिली. तर ग्रामीण विभागात आतापर्यंत डेंग्यूचे १६ रु ग्ण आढळले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र इटकरे यांनी दिली. बदलत्या हवामानामुळे उरण परिसरात ताप, सर्दी, थंडी, खोकला आदी विविध विकारांच्या रुग्णातही वाढ झाली असल्याचा दावाही इटकरे यांनी बोलताना केला.पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येही डेंग्यूच्या साथीचे पडसाद उमटले. साथीचे आजार वाढत असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. प्रशासनाकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. सचिन जाधव हे सध्याच्या घडीला डेंग्यूची साथ तसेच साथीचे आजार निवारण्यासाठी विविध उपायोजना करीत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली.
डेंग्यूसह साथीच्या आजाराने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 10:48 PM