एलआयसीच्या कारभाराचा वाशीतील नागरिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 01:06 AM2020-12-16T01:06:22+5:302020-12-16T01:06:32+5:30

ग्राहकांची तारांबळ; योजनेतील पैशांच्या परताव्यासाठी रांगा

Citizens of Vashi hit by LIC's management | एलआयसीच्या कारभाराचा वाशीतील नागरिकांना फटका

एलआयसीच्या कारभाराचा वाशीतील नागरिकांना फटका

Next

नवी मुंबई : एलआयसीच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसला आहे. विविध योजनांतील पैशांचा परतावा घेण्यासाठी ग्राहकांना कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांसह एलआयसीचे एजेंटही नाराज आहेत.
कोरोनाच्या टाळेबंदीचा सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. अनेकांची नोकरी गेल्याने घरखर्च चालविणे अवघड होऊन बसले आहे. मुलांचे शैक्षणिक शुल्क भरताना पालकांची ओढताण होत आहे. त्यामुळे भविष्याची तरतूद म्हणून एलआयसीच्या विविध योजनांत गुंतविलेले पैसे परत काढण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. त्यानुसार अनेकांनी आपल्या एलआयसीच्या पॉलिसी मुदतीअगोदर रद्द करून पैसे काढून घेण्यावर भर दिला आहे. मात्र एलआयसीच्या वाशी कार्यालयाचा संथ करभार ग्राहकांच्या रोषाचे कारण ठरला आहे. कोणत्याही योजनेतील पैशांचा परतावा घेण्यासाठी पूर्वी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागायचा. परंतु आता अर्ज करून एक ते दीड महिना झाला तरी ग्राहकांना पैसे मिळत नाहीत. परिणामी, दररोज कार्यालयात रांगा लागत आहेत. मनुष्यबळाची कमतरता असल्याची कारणे तेथील कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहेत. प्रत्यक्षात मात्र सध्या पूर्वीइतकाच कर्मचारी वर्ग कार्यालयात कार्यरत असल्याचे ग्राहक सांगतात. असे असतानाही कर्मचाऱ्यांकडून कामांत दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना दररोज कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत आहेत. पॉलिसी रद्द केल्यानंतर परतावा मिळण्यास विलंब तर होतच आहे, त्याशिवाय कार्यालयातील इतर कामेसुद्धा कूर्मगतीने सुरू असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या या मनमानीला ग्राहकच नव्हे, तर एलआयसी एजेंटसुद्धा वैतागले असून, या प्रकरणी ठाणे येथील विभागीय कार्यालयाकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. दरम्यान, यासंदर्भात एलआयसीच्या वाशी कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक रवी कनकापूरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

पैशांची तातडीची अडचण निर्माण झाल्याने मुलांच्या नावावरील पॉलिसी रद्द करण्यासाठी ३ नोव्हेंबर रोजी वाशी कार्यालयात अर्ज केला. परंतु एक महिना उलटला तरी यासंदर्भात काहीही कार्यवाही झाली नाही. कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
- लक्ष्मण जोगुला, ग्राहक (कोपरखैरणे)

Web Title: Citizens of Vashi hit by LIC's management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.