नवी मुंबई : सुनियोजीत नवी मुंबईलाही पार्किंगची समस्या भेडसावू लागली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका पार्किंग धोरण निश्चीत करत असून यासाठी नागरिकांकडून सुचना मागविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तब्बल १३८२० नागरिकांनी सर्वेक्षणात सहभाग घेवून वाहतूक कोंडीवर उपाय सुचविले असून सर्वाधीक सुचना कोपरखैरणे विभागातून आल्या आहेत.
नवी मुंबईमध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सुनियोजीत ट्रक टर्मीनल नसल्यामुळे अवजड वाहनेही रोडवर उभी केली जात आहेत. गृहनिर्माण सोसायटीमध्ये उपलब्ध जागेपेक्षा दुप्पट ते चारपट वाहनांची संख्या आहे. यामुळे खासगी वाहनेही रोडवरच उभी केली जात आहे. यामुळे शहरातील बहुतांश सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूला एक लेनमध्ये वाहने उभी केली जात आहेत. पार्किंगच्या समस्येविषयी २०१६ मध्ये जनहित याचीका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने शहरातील पार्किंगविषयी अभ्यास करून आवश्यक त्या सुचना शासनास पाठविण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने तज्ञ व्यक्तींची समिती नेमून पार्किंग धोरण निश्चीत करण्यासाठीची कार्यवाही केली आहे. शहरात पार्किंगची सुविधा कशी असावी यासाठी सर्वेक्षणही सुरू केले असून नागरिकांनाही उपाय सुचविण्यास सांगितले आहे.
महानगरपालिकेच्या पार्किंग सर्वेक्षणामध्ये शहरवासीयांनीही सहभाग नोंदविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १३८२० नागरिकांनी पार्किंग नियोजनासाठी काय केले पाहिजे याविषयी त्यांच्या सुचना सांगितल्या आहेत. २८ जुनला रात्री १२ वाजेपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार असून शेवटच्या दिवशी किती सुचना येणार याकडे महानगरपालिकेचे लक्ष लागून राहिले आहे.
पार्किंग धोरणासाठी विभागवार सहभागी नागरिकविभाग - सहभागी नागरिकबेलापूर १५०३नेरूळ २७५४वाशी १९६३तुर्भे ९५७घणसोली १२४७कोपरखैरणे ३८३१ऐरोली १२८०दिघा २८५एकूण १३८२०