- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्मार्ट सिटी डेब्रिजमाफियांचा अड्डा बनू लागली आहे. ठोस कारवाईअभावी डेब्रिजमाफियांना खुले आंदण मिळत असल्याने शहरातील मोकळी मैदाने, आडोशाच्या जागा, तसेच राखीव भूखंडावर डेब्रिजचे डोंगर तयार होताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी परवानगीच्या नावाखाली अटी-शर्तींचा भंग होत असल्याचाही आरोप होत आहे.शहराचा विकास होत असताना बांधकामातून तयार होणारे डेब्रिज अद्यापही उघड्यावर टाकले जात आहे. भविष्यात हे डेब्रिज मोठी डोकेदुखी ठरणार असल्याने अशा डेब्रिजमाफियांवर कारवाईसाठी पालिकेने काही वर्षांपूर्वी स्वतंत्र भरारी पथके तयार केली. मात्र, या पथकांच्या कार्यपद्धती आणि अधिकारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याने शहरात जागोजागी डेब्रिजचे डोंगर उभे राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.मोकळी मैदाने, रस्त्यालगत तसेच आडोशाच्या जागी रात्री-अपरात्री हे डेब्रिज टाकले जात आहे. अनेकदा नागरिकांकडून विरोध होऊनही अशा ठिकाणी डेब्रिज टाकण्याचे प्रकार थांबत नसल्याने, यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, जागोजागी दिसणाऱ्या डेब्रिजच्या ढिगाऱ्यांमुळे शहराच्या सौंदर्यीकरणात बाधा निर्माण होत आहे.नवी मुंबईला स्वच्छता तसेच इतर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. शिवाय शहरातील मोठमोठ्या आयटी कंपन्यांमुळे नोकरी, व्यवसायाच्या शोधात देशभरातील तसेच विदेशी नागरिक नवी मुंबईत स्थायिक होत आहेत. त्यांच्यापुढे डेब्रिजचे वास्तव्य येत असल्याने शहराला मिळालेल्या पुरस्कारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.तुर्भे येथील पीडब्ल्यूडी कार्यालयालगतच्या पुलाखालीही मोठ्या प्रमाणात डेब्रिजचे ढीग पाहायला मिळत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या ठिकाणी डेब्रिज टाकले जात असल्याने संपूर्ण परिसरात धूळ व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेकदा एखाद्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यासाठी पालिकेची परवानगी घेतली जाते. त्यानंतर मात्र ज्या अटी-शर्तींवर ही परवानगी दिली जाते, त्याचे उघडपणे उल्लंघन केले जाते. अशाच प्रकारे घणसोली येथील क्रीडा संकुलाच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात टाकल्या जात असलेल्या डेब्रिजच्या भरावाबाबत परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र, पालिका अधिकाºयांकडूनही गोपनीयता बाळगली जात आहे.सदर भूखंडावर तसेच परिसरातील इतरही मोकळ्या जागेत डेब्रिजसह मोठमोठे दगड, चिखल व मातीचाही भराव आणून टाकला जात आहे. त्यापासून उडणारी धूळ परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहे. यामुळे रहिवासी क्षेत्रालगत डेब्रिजचा भराव टाकण्यासाठी परवानगी देण्यापूर्वी स्थानिकांच्या सूचना व हरकतींचाही विचार घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. मात्र, यासंदर्भात परिमंडळ उपआयुक्त अमरिश पटनिगिरे यांच्याशी संपर्क साधला असता झाला नाही.खारफुटीतही टाकला भरावमहापालिका क्षेत्रात प्रत्येक नोडमध्ये डेब्रिजचे डोंगर रचले जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी खारफुटीच्या भागातही भराव टाकला जात आहे, त्यामुळे पर्यावरणाचा ºहास होत चालला आहे. त्या संदर्भात नागरिकांकडून संबंधित अधिकाºयांकडे सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. त्यानंतरही डेब्रिजमाफियांवर ठोस कारवाईकडे प्रशासनाची होणारी डोळेझाक संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे.
शहर बनतेय डेब्रिजमाफियांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:41 AM