राजदूतावासाच्या जागेवर आता थीम सिटी, सिडकोचा निर्णय, शहरातील दुसरा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:42 AM2017-09-27T04:42:03+5:302017-09-27T04:42:06+5:30
आंतरराष्ट्रीय स्तरावरून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, ऐरोलीतील रखडलेला राजदूतावासाचा प्रकल्प सिडकोने रद्द केला आहे.
- कमलाकर कांबळे ।
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावरून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, ऐरोलीतील रखडलेला राजदूतावासाचा प्रकल्प सिडकोने रद्द केला आहे. या प्रकल्पासाठी आरक्षित केलेल्या भूखंडावर आता थीम सिटी साकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यादृष्टीने चाचपणी सुरू करण्यात आल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिली.
ऐरोली सेक्टर १0 ए येथे २७.३ हेक्टर जागेवर सिडकोने आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्राचा प्रकल्प प्रस्तावित केला होता. या प्रस्तावित प्रकल्पात विविध देशांचे राजदूतावास आणि वकिलातींचा समावेश करण्याची योजना होती. विशेष म्हणजे, सुरक्षेसाठी यात ट्रिपल लेअर प्रणाली प्रस्तावित करण्यात आली होती. उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा, दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काहीच अंतरावर हा प्रकल्प असल्याने त्याला विविध देशांतील वाणिज्य दूतावासांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा सुरुवातीला सिडकोला विश्वास वाटत होता; परंतु सलग नऊ वर्षे प्रयास करूनही या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. दरम्यान, हा प्रकल्प अनेक वर्षे रखडल्याने त्यासाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडावर अतिक्रमण होऊ लागले आहे. डेब्रिजमाफियांनी या भूखंडावर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले आहे. आणखी काही काळ हा भूखंड असाच मोकळा राहिल्यास भूमाफियांकडून तो गिळंकृत करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर या भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाची थीम सिटी साकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली असून, सध्या या प्रस्तावित सिटीचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यापूर्वी सिडकोने मुंबईच्या बीकेसीच्या धरतीवर खारघर कार्पोरेट पार्कचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे ऐरोलीतील नियोजित थीम सिटी हा सिडकोचा दुसरा प्रकल्प ठरणार आहे. या दोन्ही प्रकल्पामुळे नवी मुंबईचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
हिरे, सोन्याची बाजारपेठ उभारण्याचा होता प्रस्ताव
आंतरराष्ट्रीय दूतावासाचा प्रकल्प रद्द केल्यानंतर त्या जागेवर फॅशन टेक्नॉलॉजी प्रकल्प उभारण्याचा सिडकोचा प्रस्ताव होता; परंतु संबंधित विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने तो गुंडाळण्यात आला. त्यानंतर याच जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाची हिरे, सोने व चांदीची बाजारपेठ उभारण्याची संकल्पाना होती; परंतु सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रकल्पसुद्धा कागदावरच सीमित राहिला.
सातत्याने पाठपुरावा करूनही आंतरराष्ट्रीय दूतावासाच्या प्रकल्पाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. सध्या त्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाची थीम सिटी उभारण्याची संकल्पना आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.
- भूषण गगराणी,
व्यवस्थापकीय संचालक, सिडको