शहरात ३८८७ खड्डे असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:46 PM2019-09-17T23:46:50+5:302019-09-17T23:46:56+5:30
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये फक्त ३८८७ खड्डे असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये फक्त ३८८७ खड्डे असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. यामधील ३०४५ खड्डे बुजविण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खड्डे बुजविण्यासाठी दोन कोटी ९५ लाख रुपये खर्च होणार असून खड्डे पूर्णपणे बुजविल्याची खात्री होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराला पैसे दिले जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नवी मुंबईकर नागरिकही खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. औद्योगिक वसाहतीमधील परिस्थिती गंभीर झाली आहे. शिरवणे, तुर्भे, महापे, पावणे ते दिघापर्यंत औद्योगिक वसाहतीमधील अनेक रोडवर मोठे खड्डे पडले आहेत. शहरातही प्रत्येक नोडमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्याचे पडसाद मंगळवारी स्थायी समितीमध्ये उमटले. शिवसेना नगरसेवक बहादूर बिष्ट यांनी खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. शहरात नक्की किती खड्डे आहेत, किती खड्डे बुजविले, खड्डे बुजविण्यासाठी किती पैसे खर्च केले, अशी विचारणाही त्यांनी केली. या कामामध्ये घोटाळा होत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, शहरातील खड्ड्यांचे सर्वेक्षण केले असून ३८८७ मोठे खड्डे आढळून आले आहेत. त्यामधील ३०४५ खड्डे बुजविण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. खड्डे बुजविण्यासाठी दोन कोटी ९५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. अद्याप ठेकेदाराला काहीच रक्कम देण्यात आलेली नाही. प्रशासनाने दिलेल्या खड्ड्यांच्या आकडेवारीविषयी लोकप्रतिनिधींनी शंका उपस्थित केली आहे.