नवी मुंबई: स्वच्छता अभियानातील मानांकन उंचाविण्यासाठी पहाटे सहा पासून शहर स्वच्छतेला सुरूवात करण्याचे आदेश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. शुक्रवारी पहाटे बेलापूर विभागाला अचान भेट देवून कामांची पाहणी केली. दिवसा संपूर्ण शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेवून स्वच्छता आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कामातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
स्वच्छता ही नवी मुंबई शहराची ओळख असून ती कायम टिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न आवश्यक आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. ८ विभाग कार्यालयांसाठी ८ नोडल अधिकारी नेमले असून त्या माध्यमातून प्रत्येक विभागाचे परीक्षण केले जात आहे. शहर स्वच्छतेचे काम सकाळी सहा वाजता सुरू करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत. याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी बेलापूर विभागाची पाहणी केली. ठरलेल्या वेळेत कामे झाली पाहिजेत. कोणत्याही स्थितीमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यालयात सर्व विभागांमधील कामांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. कचरा वर्गीकरणाची सुरुवात प्रत्येक घरापासूनच झाली पाहिजे. डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेगळा करावा लागू नये. कचरा संकलनासाठी विभागनिहाय सूक्ष्म नियोजन करून विभागनिहाय आराखडा आठ दिवसांत तयार करण्यास सांगितले.रिक्षा स्टँड, मार्केटमध्ये मुताऱ्या उपलब्ध करा. शहरातील रेड व यलो स्पॉटची पाहणी करण्यात यावी. रिक्षा, टॅक्सी स्टँड, मार्केटच्या ठिकाणी मुताऱ्या उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना केल्या. प्रत्येक शाळा, परिसर व तेथील शौचालय स्वच्छ असलेच पाहिजे. पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर नियमित कारवाई करण्यास सांगितले. हवा प्रदूषण रोखण्यावर विशेष लक्ष देण्यात यावे. बांधकामाचा कचरा रोडवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक विभागात वॉटर फॉगिंग व डिप क्लिनिंगवर भर देण्याच्या सूचनाही केल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह सर्व विभाग अधिकारी उपस्थित होते. नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणारस्वच्छ सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका प्रत्येक वर्षी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविते. थ्री आर सेंटर्स, थ्री आर ऑन व्हिल्स, फिशफेड, ड्रायवेस्ट बँक, ग्रीनसोल असे उपक्रम राबविले जात आहेत. ते अधिक गतिमान करून झिरो वेस्ट स्लम मॉडेलची व्याप्ती वाढवावी, अशा सूचनाही केल्या. नागरिकांचा सहभाग वाढविणारस्वच्छता सर्वेक्षणात यश मिळविण्यामध्ये नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून त्यासाठी भर देण्यात येणार आहे. माझे शहर स्वच्छ राखण्यात मी १०० टक्के योगदान देईल ही भावना नागरिकांमध्ये वाढविण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.