शहरात तीन वर्षांत ४२०० कोटी रुपये खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:56 AM2018-02-23T02:56:57+5:302018-02-23T02:56:58+5:30
महापालिकेने तीन वर्षांमध्ये तब्बल ४२०० कोटी रुपये खर्च केले आहेत; परंतु या काळात एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झालेला नाही.
नामदेव मोरे
नवी मुंबई : महापालिकेने तीन वर्षांमध्ये तब्बल ४२०० कोटी रुपये खर्च केले आहेत; परंतु या काळात एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झालेला नाही. अर्थसंकल्पातील सर्व महत्त्वाच्या योजना कागदावरच अद्याप असून, तीनही वर्षांचे अर्थसंकल्प प्रत्यक्षात अर्थहीन ठरले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश केला जातो व अशक्यप्राय वाटणारे प्रकल्प प्रत्यक्ष साकारण्यात येतात. स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी पहिली महापालिका होण्याचा बहुमान मिळविला आहे. दुष्काळात सर्वत्र पिण्यासाठी पाणी मिळत नसताना नवी मुंबईमध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. देशातील सर्वात चांगली घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, भव्य मुख्यालय, आंबेडकर भवन, खासगी शाळांपेक्षाही चांगल्या दर्जाच्या पालिका शाळांच्या इमारती, तब्बल २०० उद्याने, देशात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे उभारण्यात आली. पालिकेने स्वत:च्या खर्चाने ठाणे-बेलापूर रोडचे काँक्रीटीकरण करून वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला. गत तीन वर्षांमध्ये महापालिकेने अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश केला, परंतु प्रत्यक्षात एकही प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. तीन वर्षांमध्ये तब्बल ४२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा प्रचंड खर्च करून शहराच्या लौकिकात भर टाकणारा कोणताच प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही.
२०१५ - १६ या आर्थिक वर्षामध्ये निधी नसल्यामुळे तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मोठ्या योजना राबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. नवीन निवडून आलेल्या काही नगरसेवकांना एक वर्षामध्ये एकही महत्त्वाचे काम प्रभागात करता आले नव्हते. २०१६ - १७ या वर्षामध्ये तुकाराम मुंढे व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संवाद पूर्णपणे थांबला होता. यामुळे एकही महत्त्वाची योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. पालिकेने अर्थसंकल्पामध्ये मोरबे धरण सुशोभीकरण, मोरबे धरण सौरऊर्जा प्रकल्प, सागरी किनारा सुशोभीकरण, आगरी कोळी सांस्कृतिक भवन, गवळीदेव पर्यटन केंद्र, अडवली भुतावलीमध्ये निसर्ग उद्यान विकसित करणे, छत्रपती शिवाजी महाराज, थोर राष्ट्रीय पुरुष व शहीद व्यक्तींचे स्मारक उभारणे, वॉटर बॉडी विकसित करणे, शहर संग्रहालय, कृत्रिम चौपाटी विकसित करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. परंतु यामधील कोणतीच योजना प्रत्यक्षात पूर्ण होऊ शकलेली नाही. बाल भवन, तरण तलावासह सर्व योजना कागदावर आहेत. विशेष प्रकल्प राबविण्यात आलेला नसतानाही तीन वर्षांत ४२०० कोटी रुपये खर्च झाले असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून पुढील वर्षभरात तरी भविष्याचा वेध घेऊन विकास योजना राबविल्या जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रकल्पाचे नाव तरतूद खर्च
सागरी किनारा सुशोभीकरण १० लाख ०
गवळीदेव पर्यटन स्थळ १ लाख ०
प्रवेशद्वार ५ कोटी ०
महापुरूषांची स्मारके १२ कोटी ०
वॉटर बॉडी सुशोभीकरण १० कोटी २७ लाख
शहर संग्रहालय १ कोटी ०
कृत्रिम चौपाटी ५ कोटी ०
सायंटिफिक म्युझियम २ कोटी ०
नाना नानी पार्क ५० लाख ०
वंडर्स पार्क संगीत कारंजे २ कोटी ०
रात्र निवारा केंद्र ४ कोटी ३ लाख
ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र १ कोटी ७६ लाख ०
पक्षी व प्राणी संग्रहालय १० लाख ०
श्वान नियंत्रण केंद्राची उभारणी ६ कोटी ०
क्रीडा संकुल बांधणे १६ कोटी ५३ लाख २ कोटी
तरण तलाव ५ कोटी ०