किमान वेतनासाठी शहरवासी धरले वेठीस, महापौरांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:36 AM2017-11-22T02:36:37+5:302017-11-22T02:36:55+5:30
नवी मुंबई : कंत्राटी कामगारांनी किमान वेतनाच्या प्रस्तावाची तत्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मंगळवारी कामबंद आंदोलन केले.
नवी मुंबई : कंत्राटी कामगारांनी किमान वेतनाच्या प्रस्तावाची तत्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मंगळवारी कामबंद आंदोलन केले. यामुळे शहरात सर्वत्र कचºयाचे ढीग तयार झाले होते. कामगारांनी त्यांच्या मागणीसाठी शहर वेठीस धरल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हक्कासाठी आंदोलन करावे, परंतु त्यासाठी शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येईल व अत्यावश्यक सुविधांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी समाज समता कामगार संघाने आॅक्टोबर २०१६ पासून करण्यास सुरवात केली होती. महासभेने १९ मे २०१७ रोजी झालेल्या सभेमध्ये किमान वेतनाचा ठराव मंजूर केला व प्रशासनाने लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. परंतु प्रशासनाकडून या ठरावाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे कामगारांनी २० नोव्हेंबरला सायंकाळपासूनच कामबंद आंदोलन सुरू केले. यामुळे सोमवारी रात्री शहरात अनेक ठिकाणी पथदिवे लागले नाहीत. उद्यान व इतर ठिकाणचे विद्युत दिवेही बंद असल्याने खेळण्यासाठी गेलेल्या लहान मुलांची व विरंगुळ्यासाठी गेलेल्या नागरिकांचीही गैरसोय झाली. मंगळवारी दिवसभर शहरातील कचरा उचलण्यात आला नव्हता. सर्वच ठिकाणी दिवसभर कचºयाचे ढीग साचले होते. कचरा उचलण्यात आला नसल्याने दुपारनंतर सर्वत्र प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. घनकचरा, उद्यान, पाणी व इतर विभागातील सर्वच कामगारांनी या बंदमध्ये सहभाग घेतला होता.
कंत्राटी कामगारांच्या संपामुळे शहरवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामगारांनी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करावे, परंतु त्यासाठी कामबंद करून नागरिकांना वेठीस धरू नये. सोमवारी रात्री पामबीच रोडसह सर्वच प्रमुख रोडवरील विद्युत व्यवस्था बंद होती. अंधारामुळे गंभीर अपघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. कामगारांनी उपोषण, काळ्या फिती लावणे व इतर मार्गांचा अवलंब करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कामगारांच्या शिष्टमंडळाने महापौर जयवंत सुतार यांची भेट घेतली.
या भेटीमध्ये महापौरांनी कामगारांच्या मागण्या मान्य करून त्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व कामगारांना तत्काळ किमान वेतन देण्यात यावे, याशिवाय किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी गेलेल्या कालावधीसाठीचा फरकही देण्यात यावा अशा सूचना त्यांनी केल्या.
या बैठकीस माजी महापौर सागर नाईक, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, नवी मुंबई स्वच्छता मिशन समितीच्या सभापती नेत्रा शिर्के, राष्ट्रवादी काँगे्रसचे पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक सूरज पाटील, राजू शिंदे उपस्थित होते. कामगारांच्या वतीने मंगेश लाड, गजानन भोईर, सुनील पटेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कामगारांच्या प्रश्नावर प्रशासन सकारात्मक
घनकचरा विभागाचे उपआयुक्त तुषार चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कामगारांना किमान वेतन देण्याचे यापूर्वीच मान्य केले आहे. त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. आयुक्तांनीही कामगारांना याविषयी लवकरच अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यानंतरही कामगारांनी बंद पुकारला. नाका कामगारांच्या माध्यमातून कचरा उचलण्यास सुरवात केली होती. बुधवारपासून पूर्ववत सर्व सुविधा सुरू होतील.
>कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, ते लवकरच सोडविण्यात येतील. कामगारांना केलेल्या आवाहनानंतर त्यांनीही संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारपासून पूर्ववत कामकाज सुरू होईल.
- जयवंत सुतार, महापौर