नामदेव मोरेनवी मुंबई : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईत अमली पदार्थ विकणाऱ्या माफियांनी जाळे विणले आहे. तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या जाळ्यात अडकत आहे. शहरातील अनेक उद्याने, मैदाने व मोकळ्या इमारतीमध्ये अमली पदार्थ ओढणाऱ्यांचे अड्डे तयार झाले असून पोलीस ठोस कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.
नेरुळ सेक्टर ११ मधील सायलंट व्हॅली इमारतीमध्ये एनसीबीच्या पथकाने गुरूवारी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. यापूर्वी ड्रगमाफीया चिंकू पठाणने नवी मुंबईत एक महिना आश्रय घेतल्याचे निदर्शनास आले होते. नवी मुंबईमध्ये मागील काही वर्षात अमली पदार्थ विकणाऱ्यांनी त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजी व फळ मार्केट, मार्केटच्या बाहेरील झोपडपट्टी येथे गांजा विक्री होत असल्याचे यापूर्वीही निदर्शनास आले होते. सद्यस्थितीमध्येही या परिसरात पोलिसांचा ससेमिरा चुकवून गांजा विक्री सुरूच आहे. इंदिरानगर, तुर्भे नाका, नेरुळ एमआयडीसी, नेरुळ बालाजी टेकडीचा पायथ्या खाली असणारी झोपडपट्टी आदी ठिकाणी गांजा विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या आहेत.
नेरुळ सेक्टर २० मधील तलावाच्या परिसरातही अनेकवेळा रात्री गांजा सेवन करत अनेक तरुण बसलेले असतात. सेक्टर ६ मधील उद्यान व मैदानामध्येही रात्री संख्या जास्त आहे. रात्री रामलीला मैदानामध्येही अनेक तरुण गांजा ओढत बसलेले असतात. कोपरखैरणेमधील उद्यानामध्येही अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची दहशत आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करुनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही. कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला असून अशीच स्थिती राहिली तर नवी मुंबईची स्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तक्रारी करूनही अड्डा सुरूचनेरुळ सेक्टर २८ मध्ये बालाजी टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या झोपडीमध्ये अनेक वर्षांपासून गांजा विक्री केली जाते. अरिहंत व्हिला, सावित्री व ओम पुष्प इमारतीमधील रहिवाशांनी यापूर्वी अनेक तक्रारी केल्या आहेत. अमली पदार्थांची विक्री होणारी झोपडी हटविण्यात यावी किंवा तेथील अड्डा कायमस्वरूपी बंद करावा अशी वारंवार मागणी केली आहे. परंतु ठोस कारवाई होत नसल्यामुळे निराश झालेल्या नागरिकांनी तक्रारी करणेही थांबविले आहे
साठा हस्तगत करत दोघांविरोधात गुन्हाबाजार समितीजवळ ग्रीन पार्क झोपडपट्टीजवळ बुधवारी एक टेम्पो पोलिसांनी व अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने ताब्यात घेतला. या टेंपोमध्ये २ लाख ९५ हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये पवन गुप्ता व चंचल गौड या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
एपीएमसीमध्ये गुटखा विक्रीचे रॅकेटमुंबई बाजार समितीमध्ये गुटखा विक्रीचे सर्वात मोठे रॅकेट सक्रिय आहे. बंदी असूनही मार्केटमधील बहुतांश सर्व टपऱ्यांवर गुटखा खुलेआम विकला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय नवी मुंबईमध्ये नसल्यामुळे सातत्याने कारवाई होत नसल्यामुळे गुटखा विक्री करणाऱ्यांना अभय मिळत आहे.