शहरात अंत्यविधींसाठी पहावी लागतेय वाट; कोरोनासह इतर आजारांनी मृत्यूची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 11:17 PM2021-04-27T23:17:49+5:302021-04-27T23:19:17+5:30

कोरोनासह इतर आजारांनी मृत्यूची संख्या वाढली

The city has to wait for the funeral | शहरात अंत्यविधींसाठी पहावी लागतेय वाट; कोरोनासह इतर आजारांनी मृत्यूची संख्या वाढली

शहरात अंत्यविधींसाठी पहावी लागतेय वाट; कोरोनासह इतर आजारांनी मृत्यूची संख्या वाढली

Next

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून शहरातील स्मशानभूमी व दफनभूमीमध्ये देखील अंत्यविधीची संख्या वाढली आहे. त्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसह इतर आजारांनी मृत पावलेल्यांचाही समावेश आहे. यामुळे अंत्यविधीच्या ठिकाणी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

देशभरात कोरोनामुळे वाढते मृत्यू चिंतेची बाब ठरत आहे. सध्या देशात व राज्यात अनेक ठिकाणी एकावेळी १० ते १५ अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत. काहीशी अशीच परिस्थिती नवी मुंबईत देखील पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून नवी मुंबईतदेखील प्रतिदिन ६ ते ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. दोन महिन्यांपूर्वी ही संख्या प्रतिदिन शून्य ते दोन इतकी घसरली होती. मात्र, गत महिन्यात पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने एप्रिलच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा मृत्यूचे प्रमाण वाढू लागला आहे.

परिणामी सध्या प्रतिदिन ६ ते ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. यामुळे खासगी तसेच पालिका रुग्णालयाबाहेर नातेवाइकांच्या आक्रोशाचे भीषण दृश्य पाहायला मिळत आहे, तर कोरोनामुळे मृत्यू वाढत असतानाच इतर आजारांमुळे देखील अनेक व्यक्ती मृत पावत आहेत. त्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावणाऱ्यांचेही प्रमाण धक्कादायक आहे. परिणामी शहरात अंत्यविधीची अडचण निर्माण होऊ लागली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ३० पैकी बहुतांश स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी रोज रांग लागत आहे. यामुळे वर्षभरापूर्वी ज्याठिकाणी दिवसातून एक ते दोन अंत्यविधी केले जायचे, त्याठिकाणी सध्या दिवसाला १५ ते २० अंत्यविधी होत आहेत, तर शहरात पाच दफनभूमी असून त्यापैकी केवळ दोनच दफनभूमींमध्ये थोडीफार जागा शिल्लक आहे. त्यात खासगी ट्रस्टच्या खैरणे येथील दफनभूमीचा व बेलापूरमधील दफनभूमीचा समावेश आहे, तर उर्वरित कोपरी, नेरुळ व कोपर खैरणे येथील दफनभूमीमध्ये पुढील काही दिवसांत जागेअभावी दफनविधी बंद करण्याची वेळ येणार आहे. आजवर या सर्व ठिकाणी महिन्याला एक ते दोन मृतदेह दफन केले जायचे. मात्र, कोरोनामुळे दिवसाला एक ते दोन मृतदेह दफन करावे लागत आहेत. परिणामी वर्षभरात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात दफनविधी झाल्याने जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: The city has to wait for the funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.