शहरातील आरोग्य सेवा कोलमडली; सर्वसामान्य रुग्णांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 12:34 AM2019-05-17T00:34:17+5:302019-05-17T00:34:38+5:30
सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
नवी मुंबई : सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. औषधांचा तुटवडा, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आदींमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. याचा परिणाम म्हणून मागील काही महिन्यांपासून रुग्णांनी महापालिकेच्या आरोग्य सेवेकडे पाठ फिरविल्याने रुग्णालये ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
नवी मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी शंभर खाटांची दोन रुग्णालये, ३00 खाटांचे एक प्रथम संदर्भ रुग्णालय, तीन माता बाल रुग्णालये व २१ नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शहरवासीयांना आरोग्य सेवा पुरविली जाते. या सेवेसाठी अर्थसंकल्पात २00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी मागील काही महिन्यापासून संबंधित विभागातील अधिकाºयांच्या गलथान कारभाराचा फटका या विभागाला बसला आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. दवाखाने आणि नागरी आरोग्य केंद्रात डॉक्टर्स आणि कर्मचाºयांची कमतरता भासू लागली आहे. अत्यावश्यक औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून औषधे घेण्यास सांगितले जाते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची परवड होत आहे. वाशी येथील ३00 खाटांचे प्रथमसंदर्भ रुग्णालयात नवी मुंबईसह मुंबई, रायगड आणि शेजारच्या ठाणे शहरातील गरजू रुग्ण येतात. मात्र मागील काही महिन्यापासून येथील रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
अतिदक्षता विभागात डॉक्टर्स नसल्याने रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे अत्यवस्थेतील रुग्णांना तासनतास रुग्णालयाच्या प्रतीक्षागृहात पडून राहावे लागत आहे. बाह्य रुग्णांचेही हाल होत आहेत. अत्यावश्यक औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करायला सांगितले जाते. त्यामुळे सर्वसामान्या रुग्णांच्या खिशाला कात्री लागत आहे. याचा परिणाम म्हणून रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तीनशे खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात आजमितीस हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच रुग्ण दाखल असल्याचे दिसून येते. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयासह शहरातील महापालिकेच्या सर्वच आरोग्य सेवा कोलमडल्या आहेत.
महापालिका प्रशासनाने १ मे रोजी प्रसिद्धिपत्रक काढून वाशीतील महापालिका रुग्णालयाचे कामकाज सुरळीत सुरू झाल्याचे स्पष्ट केले होते; परंतु अद्याप येथील कामकाज सुरळीत झालेले नाही. रुग्णालयामध्ये वैद्यकशास्त्र तज्ज्ञांची कमतरता असल्यामुळे नवीन रुग्णांना भरती करता येत नाही. सद्यस्थितीमध्ये अतिदक्षता विभागामध्ये दोन ते तीन रुग्ण उपचार घेत आहेत. ट्रॉमा केअर युनिटमध्ये ५ रुग्ण आहेत. पुरुष मेडिकल विभागामध्ये ३० बेडची क्षमता असताना येथे एकही रुग्ण नाही. महिला विभागामध्ये २५ बेडची क्षमता असलेला महिला विभागात सुध्दा शुकशुकाट असल्याचे दिसून आले आहे. उपचारासाठी येणाºया रुग्णांना डॉक्टर नसल्याचे सांगून इतर ठिकाणी जाण्यास सांगितले जात आहे. यामुळे शहरातील गरीब वस्तीमधील रुग्णांना नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात जावे लागत आहे. उपचारासाठी सुरू असलेल्या धावपळीमुळे प्रचंड गैरसोय होत आहे. अनेकांना नाईलाजाने खासगी रुग्णालयामध्ये जावे लागत असून कर्ज काढून उपचार करावे लागत आहेत. महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात यापूर्वी रुग्णांसाठी जागाही उपलब्ध होत नव्हती. अनेक वेळा जमिनीवर बेड ठेवून रुग्णांवर उपचार करावे लागत होते.३00 बेडच्या रुग्णालयामध्ये जेमतेम १५० रुग्णांवरच उपचार करावे लागत आहेत. अतिदक्षता विभाग, ट्रॉमा केअर, पुरुष व महिला विभागामधील बेड मोकळे आहेत. डॉक्टर नसल्याने रुग्णांना सेवा देता येत नाही.
दोन वर्षांत केवळ दोन कोटींची औषध खरेदी
महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी २00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र मागील दोन वर्षात फक्त दोन कोटी रुपयांचीच औषधे खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे आवश्यक असलेल्या चारशे औषधांपैकी केवळ शंभर ते दीडशे औषधांचीच खरेदी केल्याचे उघड झाले आहे. औषध खरेदीला बगल देणाºया संबंधित अधिकाºयांची सखोल चौकशी झाली पाहिजे, असा सर्वसामान्य नागरिकांचा सूर आहे.
महापालिका करणार २0 कोटींची औषध खरेदी
आरोग्य सुविधांचा उडालेला बोजवारा, त्यासंदर्भात वाढत्या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी तातडीने वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. विविध कारणांमुळे आरोग्य सेवा पुरविण्यात निर्माण झालेल्या अडचणीचा त्यांना आढावा घेतला. तसेच अत्यावश्यक औषधांची तूट भरून काढण्यासाठी तातडीने २0 कोटींची औषध खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
लोकप्रतिनिधींची उदासीनता
प्रशासनाच्या धोरणात्मक निर्णयावर गळा काढून ओरडणाºया लोकप्रतिनिधींनी मात्र या प्रश्नांबाबत मौन बाळगल्याचे दिसून येत आहे. कारण मागील पाच सहा महिन्यांपासून आरोग्य सेवा कोलमडली आहे.
या विषयावर एकाही नगरसेवकाने प्रशासनाला धारेवर धरल्याचे ऐकिवात नाही. विरोधकांसह सत्ताधाºयांनी सुध्दा या विषयावर चुप्पी साधल्याने नवी मुंबईकरांची आरोग्य सुविधा रामभरोसे
झाली आहे.