शहरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:10 AM2017-08-16T01:10:17+5:302017-08-16T01:12:04+5:30
नवी मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. कोकण भवन येथे महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी आमदार मंदा म्हात्रे, कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. उपस्थित होते.
महापालिका मुख्यालयात महापौर सुधाकर सोनावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. तसेच महापालिकेचे विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. महापालिकेची विविध विभाग कार्यालये आणि शाळांतूनही ध्वजारोहण करण्यात आले. तर वाशी येथील अग्निशमन केंद्रात महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील विविध गृहनिर्माण संस्था, सामाजिक संघटनांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खैरणे गावातील महापालिकेच्या शाळा क्रमांक ८१ उर्दू शाळेत सकाळी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी स्थानिक नगरसेवक मुनावर पटेल यांच्यासह शाळेचे प्राचार्य नुसरत मजीद सागवेकर, माध्यमिक विभागाचे प्राचार्य मोहम्मद ताहीर मजीद, तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घणसोली गावातील संस्कार मित्रमंडळाच्या वतीने प्लास्टिक ऐवजी कागदी तिरंगा वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर गोविंदा पथकांना कागदी तिरंग्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अंकुश नाईक यांच्या पुढाकारातून हा अभिनव संकल्प राबविण्यात आला. वाशी रेल्वेस्थानकाजवळ वाशी किआॅक्स ओनर असोसिएशनच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष मेघनाथ भगत, कार्यक्रमाचे संयोजक विनोद प्रधान यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
>पनवेल तहसील कार्यालयात तहसीलदार दीपक चांडक, तालुका क्र ीडा संकुलात प्रांताधिकारी भरत शितोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विविध शाळा, महाविद्यालये तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात हा कार्यक्र म साजरा करण्यात आला होता. खारघरमध्ये युवा प्रेरणा संस्थेच्या मार्फत नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्र मात आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी हजेरी लावली.
>पहिला ध्वजारोहण सोहळा
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल महापालिका मुख्यालय येथे महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपमहापौर चारु शीला घरत, गटनेते परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक तसेच आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ‘पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतरचा पहिलाच स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल अत्यंत आनंद होत आहे,’ अशा भावना पनवेलच्या प्रथम नागरिक डॉ. कविता चौतमोल यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. उपमहापौर चारुशीला घरत यांनी शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना, तसेच प्रशासनाच्या गतिमान आणि पारदर्शक कारभारावर जनता खूश आहे. देशाच्या उन्नतीसाठी सर्वांनी मिळून एक दिलाने काम केल्यास विकास झाल्याशिवाय राहणार नाही. ध्वजारोहणानंतर महापालिकेच्या स्वच्छता रथाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले.
>दोनदा झेंडावंदन
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने दोनदा झेंडावंदन करण्यात आले. जाणकारांच्या नुसार एकाच संस्थेचे दोन झेंडावंदन होत नसतात. मात्र, पनवेल महानगरपालिकेच्या वतीने दोन झेंडावंदन केले. पनवेल महानगरपालिकेच्या इमारतीत आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी झेंडावंदन केले, तर पालिकेच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज मैदानात महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी झेंडावंदन केले. विशेष म्हणजे, शासकीय वेळेनुसार सकाळी ८.२० मिनिटांत पालिकेचा ध्वजारोहणाचा कार्यक्र म होता. त्याअगोदरच पालिका इमारतीत ध्वजारोहणाचा कार्यक्र म पार पडला. एकाच संस्थेच्या वतीने दोन वेगवेगळ्या कार्यक्र मांचे आयोजन करता येते का? असा प्रश्नदेखील या वेळी उपस्थित करण्यात आला.