शहरातील वाहनतळाचा प्रश्न ऐरणीवर; सिडकोसह महापालिकेचेही दुर्लक्ष, पार्किंगसाठी ठोस नियोजनच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 12:12 AM2019-05-13T00:12:53+5:302019-05-13T00:13:04+5:30
राज्यातील सर्वात स्वच्छ व देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये समावेश असलेल्या नवी मुंबईमध्येही वाहनतळाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : राज्यातील सर्वात स्वच्छ व देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये समावेश असलेल्या नवी मुंबईमध्येही वाहनतळाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाहनांची संख्या ४ लाख २६ हजार झाली असून प्रत्येक वर्षी ३० ते ४० हजार वाहनांची त्यामध्ये भर पडत आहे. परंतु त्या तुलनेमध्ये वाहनतळ उपलब्ध होत नसल्यामुळे रोडवर व जागा मिळेल तेथे वाहने उभी करावी लागत असून भविष्यात ही समस्या अजून गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई शहरातील वाढत्या नागरीकरणाला आळा बसविण्यासाठी नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली होती. प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीवर सिडकोने वसविलेल्या या नवी मुंबई शहराची नियोजनबद्ध मांडणी केल्याने नागरिकांनी देखील नवी मुंबई शहराला पसंती दिली आहे. महापालिकेच्या निर्मितीनंतर शहरात राबविण्यात आलेल्या उपक्र मांमुळे नवी मुंबई शहराचा नावलौकिक अखंड देशात झाला आहे. शहराची निर्मिती करताना सिडकोने वाहने पार्किंगसाठी अपुरे भूखंड राखीव ठेवल्याने शहरात वाहने पार्किंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरात वाढणारी वाहने, लोकसंख्या, बांधकामे या तुलनेत पार्किंगसाठी अपुऱ्या जागा असल्याने संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग केले जात आहे. सिडकोने अल्प उत्पन्न, मध्यम उत्पन्न गटासाठी लहान वसाहती निर्माण केल्या होत्या या वसाहतींमध्ये तसेच गावगावठाण आणि झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या ठिकाणी पार्किंगची सुविधा नसल्याने शेजारील अरुंद रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग केले जाते. यामुळे वाहतूककोंडीच्या समस्येबरोबर आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहचविणे अशक्य झाले आहे. शहरातील रुग्णालये, कार्यालये, हॉटेल्स, मॉल, रेल्वे स्थानके, सभागृह, नाट्यगृह, सिनेमागृह आदी सर्वच ठिकाणी पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला असून पार्किंगच्या जागेअभावी शहरात वर्दळ असलेल्या रस्त्यांवर देखील वाहने उभी केली जात आहेत.
शहरांमध्ये वाहने पार्किंगच्या समस्या उद्भवू नये यासाठी पार्किंग धोरण राबविण्याच्या सूचना न्यायालयाने वेळोवेळी दिल्या आहेत. २0१0 नंतर नवी मुंबई महापालिकेने बांधकाम आणि भोगवटा प्रमाणपत्र देताना पार्किंगबाबत काळजीवाहू धोरण राबवित परवानग्या देण्यावर भर दिला आहे. खासगी विकासकांमार्फत बांधकाम करताना पार्किंगचे नियोजन नसल्याने महापालिकेच्या परवानग्या मिळत नाहीत त्यामुळे कोणत्याही परवानग्या न घेता बेकायदा बांधकामे केली आहेत. मुंबई, ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहनतळांच्या उभारणीसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नाही. वेळेत या समस्येवर तोडगा काढला नाही तर भविष्यात पार्किंगवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रोडवरील पार्किंगवरून भांडणे : सद्यस्थितीमध्ये गृहनिर्माण सोसायटीमध्ये वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. सोसायटीबाहेर रोडवर वाहने उभी करावी लागत आहेत. रोडवरही अनेक जण पार्किंगच्या जागेवर हक्क सांगू लागले आहेत. वाहने उभी करण्यावर भांडणे होण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत.
बहुमजली वाहनतळाची गरज : शहरात महत्त्वाच्या ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्याची आवश्यकता आहे. वाशी, कोपरखैरणे, एपीएमसी, नेरूळ, सीबीडी, सीवूड या परिसरामध्ये बहुमजली वाहनतळ उभे करण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीमध्ये महापालिकेने सीबीडीमध्ये वाहनतळाचे काम सुरू केले आहे.
उद्यानाखाली पार्किंग
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जवळपास २०० उद्याने व हरित क्षेत्र आहेत. यापूर्वी उद्यानाच्या व मैदानाच्या खाली वाहनतळ विकसित करण्याचे धोरण महापालिकेने सभागृहात आणले होते, परंतु त्यावर पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही. भविष्यातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी अशाप्रकारच्या योजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. वाशीमध्ये यापूर्वी नाल्यावर वाहनतळ विकसित केला असून असे पर्यायही निर्माण करावे लागणार आहेत.
नवी मुंबईत नोंदणी झालेली वाहने
वाहन प्रकार २०१३-१४ २०१७-१८
दुचाकी १, ४०, ०७२ २,१०, ३०४
चारचाकी (कार) १, ०१, ७५३ १,३४,०९९
तीनचाकी (रिक्षा) १२,०९१ २२,३२४
शालेय बस ६५७ ८६४
ट्रक ११,९३३ १६,९७८
टँकर ४,४९९ ५,२८५
इतर सर्व वाहने ३०,७२६ ३६,९३३
एकूण वाहने ३,०१,७३१ ४,२६,७८७