लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागरिकांना आरोग्याचा कानमंत्र देण्यासाठी बुधवारी विविध स्तरांवर योगपर्वाचे आयोजन करण्यात आले होते. विविध विभागांतील युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हे यंदाच्या योगदिनाचे वैशिष्ट्य ठरले. सुदर्शन क्रिया, योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार अशा विविध माध्यमांतून समाजात योगविद्येविषयी जनजागृती करण्यात आली.वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्र येथे भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या आयुष विभागाने बनवलेला योगासनाच्या कॉमन योग प्रोटोकॉलचे सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर समर्थ व्यायामशाळेचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या योगपटूंनी मल्लखांबावरील योग प्रदर्शन केले. हा सर्व अनुभव हजारो उपस्थितांसाठी रोमहर्षक होता. त्यानंतर प्रत्यक्ष योगाभ्यासास सुरुवात झाली. हजारो नागरिकांनी या वेळी योगाचे प्रकार उत्साहात करण्यास सुरुवात केली. प्रत्येक प्रकारानंतर आनंदाने ओरडून उपस्थित एकमेकांना प्रोत्साहन देत होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनावणे, आयुषचे संचालक कुलदीपराज कोहली, संजय देशमुख, यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचबरोबर मुंबई, नवी मुंबई, ठाणेमधील वैद्यकीय विद्यार्थी व डॉक्टर्स, सीआयएसएफचे जवान यांनीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. योगसाधनेनंतर समर्थ व्यायामशाळेचे उदय देशपांडे त्याचबरोबर पी. एल. भारद्वाज, योग विद्यानिकेतचे उपाध्यक्ष दुर्गादास सावंत, विकास गोखले आणि आरती यादव या योग प्रशिक्षकांना या ठिकाणी गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्यभारतीच्या दीपक घुमे यांनी केले, तर सूत्रसंचालन भिवंडीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानगे यांनी केले. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त दि आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या पुढाकाराने योगविद्या, प्राणायम, सुदर्शन क्रियेविषयी विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. गेल्या आठवडाभरापासून शहरातील शाळा, महाविद्यालये, महत्त्वाच्या परिसरामध्ये जाऊन संस्थेच्या वतीने योगाभ्यासाविषयी जनजागृती केली जात आहे. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नसून, मन:शांती, सदृढ आणि स्वस्थ जीवनासाठी याचे विशेष महत्त्व आहे, असा संदेश दि आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून देण्यात आला. वाशीतील सेक्टर-१९ परिसरामधील सत्रा प्लाझा, दि आर्ट आॅफ लिव्हिंग सेंटर येथे शुक्रवारी, २३ जूनपर्यंत मोफत योग शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी ६.३० ते ८ या कालावधीमध्ये या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांकरिता योगाभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याकरिता चर्चासत्र, कार्यशाळा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांबरोबरच शाळेतील शिक्षकही या योग शिबिरामध्ये सहभागी झाले होते. शहरातील सर्व महानगरपालिका शाळांमध्येही योगविद्येचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला. योग प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.