कारवाईनंतरही शहरातील वाहतुकीला शिस्त लागेना; बेशिस्तपणाचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 04:51 AM2020-02-04T04:51:15+5:302020-02-04T04:52:02+5:30
झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय ; नियमांना हरताळ
नवी मुंबई : बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर सतत वाहतूककोंडी होत आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असतानाही त्यांना शिस्त लागत नसल्याचेही दिसून येत आहे. परिणामी, झेब्रा क्रॉसिंगवरही वाहने उभी होत असल्याने रस्ता ओलांडणाºया पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
मागील दहा वर्षांत शहरातील वाहनसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यात दुचाकी व रिक्षांचे प्रमाण सर्वाधिक असून, वाहतुकीचे नियम मोडणाºयांमध्येही ते अग्रस्थानी आहेत. त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. यामुळे वाढती वाहतूककोंडी व अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवार्इंचा धडाका सुरू आहे. त्यानंतरही वाहतुकीला शिस्त लागत नसल्याचा त्रास पादचाºयांना सहन करावा लागत आहे.
रस्त्याने अतिवेगात वाहने पळवणे, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे वाहने उभी करणे, सिग्नल तोडणे, असे प्रकार सर्रासपणे वाहनचालकांकडून होत आहेत. केवळ समोर वाहतूक पोलीस उभे असल्याची चाहूल लागताच तात्पुरते शिस्तीचे दर्शन घडवले जाते. मात्र, वाहतूक पोलीस रस्त्यावर नसल्यास अनेकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होते. ठाणे-बेलापूर मार्गावर खैरणे येथील सिग्नल, वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोपरखैरणे डी-मार्ट चौक, सानपाडा जंक्शन या प्रमुख ठिकाणांसह इतरही चौकांमध्ये हे दृश्य नजरेस पडत आहे. यामुळे त्या ठिकाणी रस्ता ओलांडणाºया पादचाºयांची गैरसोय होत आहे.
झेब्रा क्रॉसिंगवरच उभ्या असलेल्या वाहनांमधून वाट काढत त्यांना रस्ता ओलांडावा लागत आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा धाक निर्माण करण्यासाठी त्यांचे चालक परवाने निलंबित करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे; परंतु आरटीओकडून कारवाईची मोहीम राबवली जात नसल्याने बेशिस्त वाहनचालकांना प्रोत्साहन मिळत असल्याचीही टीका नागरिकांकडून होत आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील खैरणे (व्हाइट हाउस) येथील सिग्नल ओलांडताना पादचाºयांना जीव मुठीत धरावा लागत आहे. सिग्नल लागलेला असतानाही त्या ठिकाणी वाहने थांबत नसल्याने पादचाºयांच्या अपघाताचा धोका उद्भवत आहे. तर पुलाच्या उतारावरच हा सिग्नल असल्यानेही त्या ठिकाणी अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.