भंगार माफियांमुळे शहर असुरक्षित, तीन दिवसांत दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 11:38 PM2019-07-14T23:38:38+5:302019-07-14T23:38:46+5:30

भंगार माफियाराज डोके वर काढू पाहत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांत दोन घटनांमध्ये भंगार व्यवसायाशी संबंधित चौघांच्या हत्या झाल्या आहेत.

City unsafe due to scrap mafia, second incident in three days | भंगार माफियांमुळे शहर असुरक्षित, तीन दिवसांत दुसरी घटना

भंगार माफियांमुळे शहर असुरक्षित, तीन दिवसांत दुसरी घटना

Next

- सूर्यकांत वाघमारे 
नवी मुंबई : शहरात भंगार माफियाराज डोके वर काढू पाहत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांत दोन घटनांमध्ये भंगार व्यवसायाशी संबंधित चौघांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामागे भंगाराच्या व्यवसायात असलेल्या मोठ्या प्रमाणातील ‘अर्थ’कारणाचा संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बंद पडलेल्या कंपन्या तसेच बांधकामातून निघणारे टाकाऊ लोखंड यामुळे शहरातील भंगाराचा व्यवसाय तेजीत आहे. त्यामुळे या व्यवसायात सक्रिय असणाऱ्यांकडून भंगार मिळवण्यासाठी कसोटीचे प्रयत्न केले जातात. त्याकरिता बंद पडत असलेल्या कंपन्यांचे स्क्रॅब उचलण्यासह, जुन्या बांधकामाच्या ठिकाणी निघणारे लोखंड उचलण्याचा ठेका मिळवण्यासाठी चढाओढ लागल्याचेही चित्र शहरात पाहायला मिळत आहे. तर अनेक भंगार व्यावसायिक राजकीय वरदहस्तावर आपला व्यवसाय टिकवून आहेत. त्यांच्याकडून कायदेशीर अथवा बेकायदेशीरपणे भंगार जमवले जाते. हे भंगार साठवण्यासाठी एमआयडीसी परिसरातील वापरात नसलेल्या कंपन्या अथवा मोकळ्या भूखंडावर अवैधरीत्या गोडाऊन तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगार साठवले जात आहे. स्पर्धक इतर भंगार व्यावसायिकांचे ग्राहक स्वत:कडे वळवण्यासाठी दर तोडले जातात, याच्यातून भंगार व्यावसायिकांमध्येही वाद उद्भवत असतात.
मागील काही वर्षांपूर्वी पोलिसांनी भंगार माफियांचे कंबरडे मोडून काढले होते; परंतु दरम्यानच्या काळात एमआयडीसी परिसरातील भंगारचोरांवरील कारवाया थंडावल्याने भंगार माफियाराज पुन्हा डोके वर काढू पाहत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच प्रकारातून बोनसरी गावातील तिघा कामगारांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेच्या दोन दिवसअगोदर वाशीत विजय मल्ले या भंगार व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला होता. तो गोवंडीचा राहणारा असून, भंगाराच्या व्यवसायानिमित्ताने नवी मुंबई परिसरात तो यायचा असेही समजते. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये चौघांची हत्या झाल्याने भंगार व्यवसायात सक्रिय असणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
विजय मल्ले याच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी अश्फाक अली जावेद शेख याला अटक केली असून, तो मानखुर्दचा राहणारा आहे. त्यांच्यात भंगाराच्या धंद्यातील पैशावरून वाद होते असेही समजते. घटनेच्या दिवशी या दोघांमध्ये आर्थिक वाद झाल्याने त्याने हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिल्याचे कक्ष एक चे वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांनी सांगितले.

Web Title: City unsafe due to scrap mafia, second incident in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.