नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. मनपाच्या रुग्णालयात मार्चपासून सातपट जास्त ऑक्सिजनचा वापर वाढला आहे. सात महिन्यांत तब्बल ५० हजार टन वापर झाला असून सर्वाधिक १२,७५७ टन ऑक्सिजन सप्टेंबरमध्ये वापरात आला आहे.
नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. यानंतर महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता भासू नये यासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यास सुरुवात केली. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले. सुरुवातीच्या काळात ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची कमतरता भासू लागली. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढू लागल्या होत्या. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढू लागल्यामुळे महानगरपालिकेने नवीन रुग्णालय उभारण्यास प्राधान्य दिले. सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १२०० बेडचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात आले. तेथे ४८३ ऑक्सिजन बेडची निर्मिती केली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्यात भवनमध्ये ५०३ व राधास्वामी सत्संग भवनमध्ये ४०८ ऑक्सिजन युनिटची निर्मिती केली. कोणालाही कमतरला भासणार नाही याची काळजी घेतली.
पालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना सुरू होण्यापूर्वीच रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासली नाही. मार्चच्या तुलनेमध्ये सप्टेंबरमध्ये तब्बल सात पट मागणी वाढली. अनेक रुग्णांना प्रतिदिन ५ ते १५ लीटर ऑक्सिजन पुरवावा लागत होता. त्यापेक्षा जास्त आवश्यकता भासली की संबंधित रुग्णास आयसीयू व व्हेंटिलेटर्स युनिटमध्ये पाठविण्यास सुरुवात केली. सद्य:स्थितीमध्ये नवी मुंबईमधील खासगी व मनपाच्या रुग्णालयांमध्ये १,२३३ जण उपचार घेत आहेत. यामधील ८९३ जणांना ऑक्सिजन द्यावा लागत आहे. सप्टेंबर व ऑक्टोबरच्या तुलनेमध्ये नोव्हेंबरमध्ये मागणी कमी झाली आहे. परंतु दुसरी लाट आली तर पुन्हा ऑक्सिजनची मागणी वाढू शकते.
महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली होती. परंतु दिवाळीनंतर पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे नजीकच्या काळात दुसरी लाट आली तर सर्व रुग्णांवर योग्य उपचार करता यावेत. त्यांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत व्हावा यासाठी मनपाने पुरेसी व्यवस्था केली आहे. शहरातील मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये ४५७ आयसीयू बेड, २१७६ ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध असून, मनपाच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्येही पुरेसे ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड उपलब्ध आहेत.