नवी मुंबई : फ्रान्शेला वाझ (८) हिची तिच्या काकानेच हत्या केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण शहराने हळहळ व्यक्त केली. तिच्या शाळेतही वर्गातील मित्र-मैत्रिणींनाही अश्रू आवरता आले नाहीत. या घटनेमुळे इतर पालकांमध्येही मुलांच्या सुरक्षेविषयी भीती निर्माण झाली आहे. चार दिवसांपूर्वी आपल्याच सोबत खेळलेली फ्रान्शेला आज आपल्यात नसल्याचे समजताच न्यू हॉरिझोन शाळेतल्या तिसरीच्या वर्गात शांतता पसरली होती. हुंदके देत रडण्याचे मुलांचे आवाज मात्र ही शांतता भंग करत होते. तिच्यासोबत एकाच बेंचवर बसणारी मैत्रीण असो किंवा स्कूल बसमधील मित्र-मैत्रिणी असोत, सर्वांचेच डोळे पाणावलेले होते. या चिमुरड्यांना घटनेचे गांभीर्य समजेल एवढी समज त्यांच्यात दिसून येत होती. कदाचित यामुळेच त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसून येत होती. ऐरोली सेक्टर ८ येथील एकवीरा सोसायटीत राहणाऱ्या फ्रान्शेलाच्या काकानेच (मावशीचे पती) तिचे अपहरण करून हत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी पोलीस तपासात समोर आले. तीन दिवसांपूर्वी शाळेतून घरी जात असताना सोसायटीच्या आवारातून ती बेपत्ता झाली होती. सोसायटीबाहेरच दबा धरून बसलेल्या क्लेअरन्स फ्रान्सेका (३८) या तिच्या काकाने प्रेमाने हाक मारून तिचा घात केला होता. परंतु हरवलेली फ्रान्शेला आज ना उद्या सुखरूप मिळेल, अशीच आशा कुटुंबीयांसह मित्र-मैत्रिणींना व पोलिसांना होती. तिच्या मृत्यूच्या घटनेने दुखावलेल्या वर्गमित्रांनी फळ्यावर तिचा फोटो लावून तिच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सामूहिक प्रार्थनादेखील केली.तिच्यावरील हा प्रसंग टळलादेखील असता. विश्वासघात करून काकाच तिला पळवून नेताना कोणी पाहिले असते अथवा सोसायटीच्या आवारात कॅमेरे बसवलेले असते तर.. परंतु घटनेच्या वेळी तिथे सुरक्षारक्षक उपस्थित नव्हता. पोलिसांनीही सोसायटीतल्या या सुरक्षेतील निष्काळजीपणाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तिला सोसायटीच्या गेटवरून घरापर्यंत नेण्यासाठी कुटुंबातले कोणीच येत नसे. फ्रान्शेला हुशार असल्याने अनोळखी व्यक्तीसोबत जाणार नसल्याचे घरच्यांना माहीत होते. परंतु कुटुंबातीलच व्यक्ती असा घात करू शकते, असा विचारही कोणाच्या मनात आला नसावा. (प्रतिनिधी)ऐरोली बंदफ्रान्शेला हिच्या मृत्यूमुळे ऐरोलीत शनिवारी बंद पाळण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल येथील न्यू हॉरिझोन शाळांना शनिवारी सुटी देण्यात आली आहे.
फ्रान्शेलाच्या हत्येने शहर हळहळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2015 1:36 AM