शहराला पावसाने झोडपले
By admin | Published: June 29, 2017 03:06 AM2017-06-29T03:06:13+5:302017-06-29T03:06:13+5:30
नवी मुंबईसह पनवेलला बुधवारी पावसाने झोडपले. जेएनपीटी रोडच्या रुंदीकरणासाठी केलेल्या भरणीमुळे उरण रोड जलमय झाल्याने वाहतूककोंडी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, पनवेल : नवी मुंबईसह पनवेलला बुधवारी पावसाने झोडपले. जेएनपीटी रोडच्या रुंदीकरणासाठी केलेल्या भरणीमुळे उरण रोड जलमय झाल्याने वाहतूककोंडी झाली होती. नवी मुंबईमध्ये ९ ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटनांची नोंद झाली.
जेएनपीटीकडे जाणाऱ्या रोडच्या कामासाठी उरण-पनवेल रोडवर चिंचपाडा येथे भरणी करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पाणी जाण्यासाठी जागाच नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. मोटारसायकल व इतर छोटी वाहने अडकून पडल्याने जवळपास एक तास वाहतूककोंडी झाली होती. पहिल्याच पावसामध्ये येथील स्थिती बिकट झाली असून, योग्य खबरदारी न घेतल्यास पुढील काही दिवसांमध्ये स्थिती बिकट होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. खारघर, कामोठे, कळंबोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली होती. पनवेल परिसरामध्ये १०० मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्येही दिवसभर ६२ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. बेलापूरमध्ये ६३, नेरुळमध्ये ५८, ऐरोलीमध्ये ७४ व वाशीमध्ये ५५ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. शहरामध्ये ९ ठिकाणी वृक्ष कोसळल्याची नोंद झाली आहे. ऐरोली सेक्टर २ व ३मध्येही पाणी साचल्याची नोंद आहे. सायन-पनवेल महामार्गावर खड्यांमुळे वाहतूककोंडी झाली होती.